डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे. शून्य प्रहरमध्ये आपल्याला हा मुद्दा उपस्थित करायचा असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. डोंबिवलीकडे जाणाऱ्या आणि डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, “डोंबिवली लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या प्रमाणापेक्षा जास्त गर्दीचा तसंच लोकल उशिराने धावण्याचा मुद्दा नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केला आहे. डोंबिवलीकडे जाणाऱ्या आणि डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी केंद्राकडे केली आहे”.

पत्रात काय लिहिलं आहे ?
काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या डोंबिवली-सीएसएमटी लोक ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीचा मुद्दा मला उपस्थित करायचा आहे. ही डोंबिवली लोकल असूनदेखील आणि डोंबिवली स्थानकातून सुटणं अपेक्षित असतानाही ही ट्रेन कल्याणहून सुटते. यामुळे ट्रेन जोपर्यंत डोंबिवलीला पोहोचते तेव्हा गर्दीने भरुन येते. परिणामी डोंबिवलीतील प्रवाशांना बसण्यासही जागा शिल्लक राहत नाही. तसंच अनेकदा लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या असतात यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडतो. रेल्वे अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार करुनही काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.