संतोष प्रधान

पक्षाचा आज वर्धापन दिन; काँग्रेस कमकुवत झाल्याचा फायदा उठविण्या प्रयत्न

सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित करीत काँग्रेसला पर्याय म्हणून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण देशात किंवा राज्यात काँग्रेसला पर्याय उभा करण्यात कधीच यश आले नाही. सध्या काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याचा फायदा उठवून राज्यात राष्ट्रवादीचा पाया अधिक विस्तारण्याचा सोमवारी २० वर्षे पूर्ण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. सुरुवातीच्या काळात सत्तेची चव चाखणाऱ्या पक्षाला दोन दशकांनंतर मात्र अस्तित्वासाठी धडपड करावी लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोमवारी २१व्या वर्षांत पदार्पण करीत असून, पक्षाचा वर्धापनदिन हा जलदिन संकल्प म्हणून पाळला जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. यानिमित्त राज्यभर जलदिंडय़ा काढण्यात येणार आहेत. १९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासून अवघ्या साडेचार महिन्यांत पक्ष राज्याच्या सत्तेत आला. तेव्हापासून १५ वर्षे पक्ष सत्तेत भागीदार होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का बसला. राज्यात चार आणि लक्षद्वीपमध्ये एक, असे एकूण पाच खासदार निवडून आले. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता, राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत फार काही चांगले यश मिळेल, असे चित्र तरी  दिसत नाही. पक्षाचे अनेक नेते सोडून गेले वा आणखी काही नेते विधानसभा निवडणुकीच्या वेळी रामराम ठोकण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांचा राजकीय वारस कोण, अजित पवार की सुप्रिया सुळे ही चर्चा वर्षांनुवर्षे सुरू असते. पण आता तिसऱ्या पिढीतही स्पर्धा बघायला मिळते. पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून लढता यावे म्हणून शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली. तेव्हा पवारांचे आणखी एक नातू रोहित पवार यांनी पवारांनी माघार घेऊ नये, असे आवाहन केले होते. रोहित पवार सध्या पवारांसमावेत विविध कार्यक्रमांमध्ये बरोबर दिसतात. पक्षाला २० वर्षे पूर्ण होत असताना पवार कुटुंबीयांमध्ये राजकीय स्पर्धा वाढली आहे.

पाया विस्तारण्यात अडचणी

राज्यात काँग्रेसची जागा घेता येईल, असे शरद पवार यांचे गणित होते. पण गेल्या २० वर्षांमध्ये काँग्रेसला पिछाडीवर टाकणे राष्ट्रवादीला दोन अपवाद वगळता शक्य झाले नाही. राष्ट्रवादी सर्वव्यापी पक्ष झाला नाही. सर्व जाती, जमाती वा धर्मात पक्षाला तेवढे स्थान मिळाले नाही. विदर्भ आणि मुंबईत पक्ष कमकुवतच राहिला. काँग्रेसच्या मदतीनेच वाटचाल करावी लागली. तरीही काँग्रेसला अडचणीत आणण्याची एकही संधी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने सोडली नाही. केंद्र व राज्यातील सत्तेतील भागीदारीची पुरेपूर किंमत राष्ट्रवादीने वसूल केली.

छगन भुजबळ यांना झालेली अटक, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर असलेली सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची टांगती तलवार यातून राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर परिणाम झाला. राष्ट्रवादीची राजकारणाबद्दल व भूमिकेबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह उभे केले गेले. काँग्रेसवर कुरघोडी करणाऱ्या राष्ट्रवादीने अनेकदा भाजप वा शिवसेनेला मदत केली वा त्यांची मदत घेतली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या एवढीच राष्ट्रवादीसाठी समाधानाची बाब.

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी विधानसभा निवडणुकीत चित्र नक्कीच वेगळे असेल. राष्ट्रवादी आघाडीला नक्कीच चांगले यश मिळेल. राष्ट्रवादी पुन्हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल.

-जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष