धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर बसवण्यात आलं आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ समोर आला आहे. धारावीत चार करोनाग्रस्त सापडले आहेत. आजच एका ३० वर्षांच्या महिलेला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहताच लक्षात येतं की सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर नियमांचे इथे तीन तेरा वाजले आहेत.

आज दुपारीच धारावीत एका तीस वर्षांच्या महिलेला करोना झाल्याची बातमी समोर आली होती. धारावीत करोनाची लागण झालेली ही चौथी महिला आहे. तिच्या आधी तीन रुग्णांना करोनाची लागण झाली. त्यातील एकाचा करोनामुळे मृत्यू झाला. एकीकडे हा धोका वाढत असताना करोनाची लागण होऊ नये म्हणून जे आवाहन केलं जातं आहे, नियम पाळा सांगितलं जातं आहे ते नियमच धाब्यावर बसवले गेल्याचं चित्र आहे.

दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले पाचजण धारावीत गेले होते. ते पाचही जण धारावीत राहिले होते. ज्याच्या फ्लॅटमध्ये हे लोक राहिले त्याचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान २ ते ३ दिवसांच्या कालावधीत मरकजहून आलेल्या पाच जणांचा संपर्क हा किमान १०० जणांशी आला होता अशीही माहिती मिळते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. महाराष्ट्रात आजच ४७ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४३ जण हे मुंबई आणि ठाण्यातील आहेत. अशात आता धारावीत चौथा रुग्ण आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे. अशात वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले गेले आहेत असंच या व्हिडीओतून समोर आलं आहे.