मुंबई : करोना उद्रेकानंतर वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी देशभरात वाढली आहे. ऑक्सिजनच्या सिलेंडरसह वैद्यकीय द्रवरूप ऑक्सिजनही परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होण्यासाठी याचे दर निश्चित करत राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) निर्बंध आणले आहेत.

करोनाकाळात वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी देशभरात चौपटीने वाढली आहे. परिणामी उत्पादक आणि वितरकांकडून अवाच्या सव्वा किमती आकारल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर दरांवर नियंत्रण आणण्यात आले आहे. नव्या दरानुसार उत्पादकांसाठी द्रवरूप ऑक्सिजनचे दर जीएसटीवगळता १५.२२ रुपये प्रति घनमीटर असल्याचे शनिवारी एनपीपीएने जाहीर केले आहे. तर ऑक्सिजनच्या सिलेंडरच्या दरात वाढ करत १७.४९ रुपयावरून २५.७१ रुपये प्रति घनमीटर केले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दर नियंत्रित केले असून पुढील सहा महिन्यांसाठी हे दर लागू असणार असल्याचे यात नमूद केले आहे.