मुंबई : मराठा आरक्षण बेकायदा असून ते रद्द करण्यात यावे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, या मागण्यांसाठी ओबीसी संघटनांनी आझाद मैदानावर सोमवारी एल्गार केला.

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळून लावावा, अशी मागणी करीत ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास हा समाज सरकारला त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा ओबीसी नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिला. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मराठा समाज मागासवर्गीय असल्याने त्यांना आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाने केली आहे. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करण्यास त्यांचा विरोध आहे. या पाश्र्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी ओबीसी संघटनांनी आझाद मैदानावर एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. मराठा आरक्षण घटनाबाह्य़ असून ते न्यायालयात टिकणार नाही, असा दावा राठोड यांनी यावेळी केला.

माजी आमदार प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर, श्रावण देवरे आदी ओबीसी नेते मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जागा ओबीसी समाजाच्या नेत्यांना द्याव्यात, अशी आग्रही मागणीही या वेळी ओबीसींच्या वतीने करण्यात आली.