करोना प्रादुर्भावामुळे लागू झालेल्या टाळेबंदीचा फटका मुंबईतील मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाला चांगलाच बसला आहे. ई—नोंदणी सुरू असली तरी एप्रिलपासून आतापर्यंत फक्त २८ भाडेकरारांची नोंदणी झाली असून राज्याला त्याद्वारे ४४ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्याचवेळी राज्यात इतरत्र नोंदणी सुरू असून त्याद्वारे राज्याच्या महसुलात थोडीफार भर पडत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे हे सर्वाधिक महसूल मिळवून देणारे विभागात लाल क्षेत्रात गेल्यामुळे हा परिणाम झाला आहे.

या विभागाचे नवे आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू झाले. २४ मार्चपासून राज्यात टाळेबंदी लागू झाली. मार्च महिन्यात या विभागाला मोठा महसूल मिळतो. मार्च महिन्यात या विभागाला राज्यात १४०० कोटींच्या आसपास मिळणाऱ्या महसुलापैकी ४०० कोटी रुपये एकटय़ा मुंबईतून मिळाले होते. एप्रिल महिन्यात मुंबईत ई—नोंदणीद्वारे फक्त २७ भाडेकरार नोंदले गेले. त्यातून ४३ हजार ५४७ रुपये मिळाले तर मे महिन्यात फक्त एक करार नोंदला गेला व त्यातून ४२४ रुपये मिळाले. मार्च महिन्यात ई—नोंदणीचा आकडा मुंबईत १२ हजार ९०७  तर राज्यात ४६ हजार ५२७ इतका होता. या वरून भाडेकराराच्या माध्यमातून मिळणाऱ्या मोठय़ा महसुलाला राज्याला मुकावे लागले आहे.

मुंबईत अशी परिस्थिती असली तरी राज्यात आतापर्यंत विविध प्रकारच्या पाच हजार २५ करारांची नोंदणी झाली असून त्यातून फक्त २० कोटींचा महसूल मिळाला आहे. हा महसूल टाळेबंदी उठल्यानंतर वाढेल, असा विश्वास नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने व्यक्त केला आहे.