सरकार स्थापण्याकरिता शिवसेनेने संपर्क साधला असला तरी काही मुद्दय़ांवर व्यापक चर्चेची आवश्यकता आहे. ही चर्चा होऊन सहमती झाली तरच शिवसेनेला पाठिंब्याबाबत विचार करता येईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला सोमवारी पत्र देणे अपेक्षित होते; पण दोन्ही काँग्रेसने पत्र देण्याचे टाळल्याने सरकार स्थापण्याचा दावा करण्याकरिता गेलेले शिवसेना नेते तोंडघशी पडले होते. या गोंधळाबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने परस्परांवर खापर फोडले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अहमद पटेल, सी. वेणूगोपाळ आणि मल्लिकार्जुन खरगे हे शरद पवार यांची भेट घेण्याकरिता खास मुंबईत आले होते. सायंकाळी या तिन्ही नेत्यांशी पवारांशी सुमारे दोन तास चर्चा केली.

या चर्चेनंतर दोन्ही काँग्रेस नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले.  सरकार स्थापण्यासाठी पाठिंबा द्यावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला. आमची आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याकरिता आम्ही मुंबईत आलो, असेही पटेल यांनी सांगितले.

शिवसेनेला पािठंबा देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कारण आमच्याकडे अजून बरीच सवड आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.

आधी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल. काही मुद्दय़ांवर स्पष्टता यावी लागेल. काँग्रेसबरोबर सहमती झाल्यावर मगच शिवसेनेशी चर्चा करू, असेही पवार यांनी सांगितले.

शिवसेनेला पाठिंबा देऊन  काँग्रेस पक्ष वैचारिक धोरणाशी प्रतारणा करणार का, या प्रश्नावर अहमद पटेल यांनी, निधर्मवादाच्या धोरणाशी समझोता केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. संयुक्त सरकारमध्ये सत्तेचे वाटप कशा प्रकारे करायचे यावर अद्याप काहीच चर्चा झालेली नाही. आधी एकत्र येण्याचा निर्णय झाल्यावर पुढील सारी चर्चा होईल, असे पवार यांनी सांगितले.