ठेकेदार कंपनीला हटवून ‘एमएमआरडीए’कडे संचालन; तीन महिन्यांत दुसरा टप्पा, गाडय़ा वाढवणार

शुभारंभापासूनच रडतरखडत सुरू असलेली भारतातील पहिली मोनोरेल वाहतूक यंत्रणा आता कात टाकणार आहे. गेल्या चार वर्षांपासून मोनोरेल चालवण्याची जबाबदारी असलेल्या मलेशियन कंपनी ‘स्कोमी’ने कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मोनोच्या चाव्या शुक्रवारपासून स्वत:कडे घेतल्या. आता मोनोच्या सध्याच्या दोन गाडय़ांची दुरुस्ती करण्यासोबतच येत्या महिनाभरात आणखी दहा गाडय़ांसाठी निविदा काढण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. तसेच येत्या तीन महिन्यांत मोनोरेलचा वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पाही कार्यान्वित केला जाणार आहे.

‘स्कोमी’ आणि ‘एल अ‍ॅण्ड टी’ यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या ‘एलटीएसई’ कंपनीच्या गळ्यात मोनोची माळ टाकून ‘एमएमआरडीए’ने फे ब्रुवारी २०१४ मध्ये मोनोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. मात्र, सुरुवातीपासूनच या रेल्वेसेवेला प्रवाशांचा कमी   प्रतिसाद मिळाला. त्यातच नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात गाडीला लागलेल्या आगीनंतर जवळपास १० महिने मोनोसेवा पूर्णपणे बंद होती. या आगीमुळे २५ कोटींचे नुकसानही झाले. ‘एमएमआरडीए’ने ‘स्कोमी’ला आर्थिक बळ देऊन १ सप्टेंबरपासून मोनोची सेवा पुन्हा सुरू केली. यादरम्यान ‘स्कोमी’चे कंत्राट संपल्यानंतर एमएमआरडीएने काढलेल्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने मोनोरेलची जबाबदारी पुन्हा ‘स्कोमी’कडेच देण्यात आली; परंतु वारंवार सूचना देऊनही ‘स्कोमी’ने कंत्राटातील वायदे पूर्ण न केल्याने अखेर या कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

नव्या मोनो गाडय़ांची पूर्तता, नादुरुस्त गाडय़ांच्या यांत्रिक  भागांचा पुरवठा, दुसरा टप्पा कार्यान्वित करण्याची निश्चिती अशा कंत्राटामधील अटी गेल्या वर्षभरात स्कोमीने पूर्ण केल्या नाहीत. शिवाय त्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. त्यामुळे अखेरीस त्यांना प्रकल्पामधून हद्दपार करून शुक्रवारपासून संपूर्ण कारभार आम्ही स्वीकारल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी दिली. तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने विविध विभागांचे प्रमुख म्हणून प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ‘प्रकल्प अंमलबजावणी युनिट’कडून (पीआययू) व्यवस्थापनाचे काम पाहिले जाणार आहे. त्यानंतर नव्याने स्थापन होणाऱ्या ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळा’मध्ये मोनो प्रकल्पाचा समावेश करण्यात येणार असल्याचे राजीव म्हणाले. डेपोमध्ये असलेल्या सहा नादुरुस्त गाडय़ांच्या यांत्रिक भागांसाठी काही दिवसांमध्ये निविदा काढण्यात येतील. तसेच जानेवारी महिन्यापर्यंत नवीन १० गाडय़ांसाठी निविदा काढल्या जातील. या १० गाडय़ा टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होतील. नादुरुस्त गाडय़ांपैकी दोन गाडय़ा तातडीने दुरुस्त करुन सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असेल, तर त्यानंतर उर्वरित चार गाडय़ा दाखल करून तीन महिन्यांमध्ये दुसरा टप्पा सुरू करू.

– आर.ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

प्रकल्प

चेंबूर ते वडाळा – पहिला टप्पा

वडाळा ते सातरस्ता – दुसरा टप्पा

एकूण लांबी – १९ किलोमीटर

स्थानके – १७

२००८ – एलटीएसईच्या मदतीने प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात

२०१४ – चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा कार्यान्वित

२०१५ – भक्ती पार्क येथे मोनो अडकली. प्रवाशांचा बचाव

२०१६ – दरवाजे उघडणे, टायर फुटणे आणि विद्युतपुरवठा बंद झाल्याने मोनोचो तीन वेळा खोळंबा

२०१७ – म्हैसूर स्थानकात मोनो डब्याला आग. दहा महिने सेवा ठप्प

२०१८ – १ सप्टेंबर रोजी सेवा कार्यान्वित

२०१८ – १४ डिसेंबरला स्कोमी प्रकल्पातून हद्दपार

उत्पन्नवाढीसाठी विविध पर्याय

* मोनोचे दोन्ही टप्पे सुरू झाल्यानंतर प्रतिदिवस १.५ लाख प्रवासी या मार्गावर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्प ताब्यात घेताना उत्पन्नवाढीच्या दृष्टीने विविध उपाययोजना ‘एमएमआरडीए’कडून राबविण्यात येणार आहेत.

*  वडाळ्यातील मोनोच्या डेपोतील रिकाम्या जागेवर बांधकाम करून त्या व्यावसायिक कामांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येतील.

*  मोनोची स्थानके, डबे आणि खांब खासगी जाहिरातदारांसाठी खुले करण्यात येणार आहेत. टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून मोबाइल कंपन्यांना त्यांचे टॉवर उभारण्यासाठी आमंत्रित केले जाईल. यातून साधारण १० ते ८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

*  स्थानकांच्या छतावर सौरऊर्जा पॅनल लावून निर्माण झालेली अतिरिक्त ऊर्जा विकण्यात येईल.