|| सुशांत मोरे

सुरक्षा प्रणाली नसल्यास वाहन नोंदणी नाही

प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करून घेण्यासाठी केंद्र शासनाने काळ्या-पिवळ्या टॅक्सी, टूरिस्ट टॅक्सी व खासगी प्रवासी बस या सार्वजनिक सेवा वाहनांसाठी पॅनिक बटन व व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्याची सक्ती केली आहे. पॅनिक बटन न बसवल्यास वाहन नोंदणी विसरावी लागणार आहे.

मुंबईत जानेवारी २०१९ पासून नोंदणी झालेल्या एकूण ४८७ वाहनांत ही प्रणाली बसवण्यात आल्याची माहिती आरटीओकडून देण्यात आली. जुन्या सार्वजनिक वाहनांसाठी मात्र अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने यांसदर्भातील निर्णयाची जबाबदारी राज्य सरकारवरच सोपविली आहे.

टूरिस्ट टॅक्सी आणि खासगी बस गाडीतून प्रवास करताना महिला प्रवाशांवर झालेल्या बलात्काराच्या घटना, त्याचप्रमाणे रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना इच्छित स्थळी न पोहोचवता मध्येच उतरवणे यासह अनेक प्रकारच्या घटना सार्वजनिक सेवा असलेल्या वाहनांमध्ये घडल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता आपत्कालीन परिस्थीतीत पोलिसांशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधता यावा यासाठी पॅनिक बटन आणि वाहनाच्या सद्य:स्थितीची माहिती देणारी व्हेइकल ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्याची मागणी केली जात होती. अखेर केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १२५ मध्ये (एच)मध्ये ही तरतूद केली आहे.

त्यानुसार सर्व सार्वजनिक सेवा वाहनांना व्हेइकल ट्रॅकिंग यंत्रणा प्रणाली आणि पॅनिक बटन बसवण्याचे १ जानेवारी २०१९ पासून अनिवार्य केले आहे. यामधून दुचाकी वाहने, ई-रिक्षा, तीन चाकी वाहने आणि ज्या वाहनांना परवाना लागू नाही, अशी वाहने वगळण्यात आली आहेत. हे उपकरण बसविण्याची उत्पादक, विक्रेता व चालकाला सक्ती केली आहे.

मुंबईत अंधेरी, वडाळा व ताडदेव आरटीओपैकी अशा प्रकारे ताडदेव आरटीओत सर्वाधिक २६६ टॅक्सी व १४ बस गाडय़ांना ही प्रणाली बसवण्यात आली आहे. नवीन वाहनांसाठी ही प्रणाली बंधनकारक असतानाच १ जानेवारी २०१९ पूर्वीच्या सार्वजनिक सेवा वाहनांसाठी मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही.

जुन्या वाहनांबाबत राज्य शासनाकडून अधिसूचना जारी होईपर्यंत नवीन वाहनांना यंत्रणा बसवताना त्या वाहनाची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणी करण्यात येत असल्याचे आरटीओतील सूत्रांनी सांगितले. आरटीओत नव्याने नोंद होणाऱ्या सार्वजनिक सेवा वाहनांनी नियम न पाळल्यास नोंदणी होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

कंपनीचे कॉल सेंटर

  • अंधेरी आरटीओतंर्गत ८५ टॅक्सी, १२ बस तसेच वडाळा आरटीओत २६ बस आणि ८४ टॅक्सींना नवीन प्रणाली बसविली आहे.
  • प्रवाशांनी पॅनिक बटनचा वापर केल्यास नवीन प्रणाली बसवणाऱ्या कंपन्याच्या स्वतंत्र कॉल सेंटरकडून मदत दिली जाणार आहे. त्यासाठी पोलीस व अन्य यंत्रणेचीही मदत मिळेल.
  • राज्य सरकारकडूनही या प्रणालीसाठी कॉल सेंटर उभारण्याचे प्रयत्न होत आहेत.