वातानुकूलनाद्वारे करोना संसर्गाची भीती

मुंबई : बेस्ट उपक्र माच्या सेवेत ६५० वातानुकू लित मिनी बसगाडय़ा आल्या असल्या तरी करोनामुळे या गाडय़ांच्या वापराबाबत वेगळाच वाद उद्भवला आहे. करोना संसर्गामुळे गाडय़ांमध्ये वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवण्यास प्रवासी, बेस्ट समिती सदस्यांचा विरोध आहे. करोनाच्या भीतीने प्रवासीही या बसमधून प्रवास करणे टाळत आहेत.

बेस्टकडून सध्या ३,२२४ बस चालवल्या जात असून दररोज ११ लाख ७२ हजार प्रवासी प्रवास करतात. टाळेबंदीआधी बेस्टची प्रवाशी संख्या ३० लाखांवर होती. करोनाचा संसर्ग सुरू होताच बेस्ट उपक्र माने शासनाच्या नियमानुसार वातानुकूलित मिनी बसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवली व प्रवाशांसाठी बसमधील खिडक्या उघडय़ा ठेवून बस चालवण्यात आल्या. त्यावेळी पाच रुपये तिकीट आकारले जात होते. मात्र आता वातानुकू लित प्रवासासाठी सध्या पाच किलोमीटर अंतरासाठी सहा रुपये तिकीट असून साध्या बसचे पाच किलोमीटपर्यंतचे तिकीट पाच रुपये आहे. त्यामुळे उत्पन्नासाठी वातानुकू लित यंत्रणा सुरू ठेवून बस सेवेत आणल्या. परंतु वातानुकू लित यंत्रणेमुळे करोना संसर्गाचा धोका अधिक होऊ शकतो, अशी भीती प्रवासी व्यक्त करत आहेत.

शासनाचा नियम असतानाही तो बेस्टकडून पाळला जात नाही. उकाडा होत असला तरीही प्रवाशांचे आरोग्य महत्त्वाचे असून या प्रवासावर बेस्ट उपक्र माने तोडगा काढणे गरजेचे असल्याचे बेस्टचे प्रवासी अ‍ॅड. प्रशांत साने म्हणाले. सायन ते चेंबूर असा बेस्टच्या ३५२ क्र मांकाच्या वातानुकू लित बसने प्रवास करताना यातील वातानुकू लित यंत्रणा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व प्रवाशांची संख्या पाहता हे धोकादायक ठरू शकते, अशी भीती त्यांनी वर्तवली.

बेस्ट समिती सदस्यांचाही विरोध

मुंबई पालिके तील विरोधी पक्षनेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनीही वातानुकू लित यंत्रणा सुरू ठेवून बसगाडय़ा चालवण्यास विरोध दर्शविला आहे. वातानुकूलित सेवेतून एक रुपया जादा मिळत असला तरी त्यासाठी प्रवाशांच्या आणि चालक, वाहकांच्या जीविताशी खेळू नये. त्यातच बसमधून मोठय़ा प्रमाणातप्रवासी प्रवास करत असून सामाजिक अंतराचे नियमही पाळले जात नाही. ही बाब मुंबई पालिका आयुक्तांच्याही निदर्शनास आणून दिली असून बेस्ट महाव्यवस्थापक मात्र दुर्लक्षच करत असल्याचा आरोप राजा यांनी के ला. तर भाजपचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी वातानुकू लित यंत्रणेचा वापर टाळण्याच्या सूचना शासनाने के ल्या असून बेस्ट उपक्र माने याकडे दुर्लक्षच के ल्याचे सांगितले.