महापालिकेची नवी नियमावली

 मुंबई: लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या ब्रिटन, युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून वगळण्याचे आदेश पालिकेने शनिवारी दिले आहेत. त्यामुळे लस घेतलेल्या प्रवाशांना आता संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक असणार नाही.

नवकरोनाच्या पाश्र्वभूमीवर ब्रिटन, युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि मध्य-पूर्व या देशांतून आलेल्या प्रवाशांना सात दिवस हॉटेलमध्ये किंवा संस्थात्मक विलगीकरण आणि नंतर सात दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. अनेक देशांमध्ये करोना लसीकरण सुरू केले असून अनेक प्रवाशांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे निदर्शनास येत आहे. तेव्हा अशा प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याची आवश्यकता नाही. तेव्हा यांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याचा आदेश पालिके ने शनिवारी जाहीर के लेल्या नव्या नियमावलीत दिला आहे. लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्रासह स्वयंघोषणापत्र प्रवाशांनी सादर करणे बंधनकारक असणार आहे.

रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी काही डॉक्टर प्रवास करतात. त्यांनाही  संस्थात्मक विलगीकरणाच्या अटीतून वगळण्यात येत असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.

६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यात असलेली गरोदर महिला  यांचा विचार करून नवी नियमावली पालिकेने तयार केली असून त्यांना संस्थात्मक विलगीकरणातून वगळले आहे. परंतु पुढील सात दिवस गृहविलगीकरणात राहणे मात्र आवश्यक आहे.

यांना मुभा..

* ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यात असलेली गरोदर महिला, आई आणि वडिलांसोबत पाच वर्षांखालील मूल असल्यास

* कर्करोग, अतिगंभीर शारीरिक व्यंगत्व, मानसिक आजार, सेलेब्रल पाल्सी इत्यादी प्रकारचे गंभीर आजार असलेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असल्यास..

* संस्थात्मक विलगीकरणात न ठेवता रुग्णालयात दाखल करावे. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल.

* घरातील अगदी जवळचे नातेवाईक आई, वडील, मुलगा, मुलगी यांची प्रकृती गंभीर असल्यास किंवा गंभीर अपघात झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास.

* प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रवास करणारे डॉक्टर.