प्लॅटफॉर्मची उंची तेवढीच, गाडय़ा होताहेत उंच
जुन्या आणि नव्या गाडय़ांच्या उंचीतही तफावत
कमी उंचीचे प्लॅटफॉर्म आणि अधिक उंच गाडय़ा यामुळे निर्माण होणाऱ्या पोकळीवरून सध्या खूप ओरड सुरू आहे. या पोकळीत अडकल्याने अनेक प्रवासी जखमी होत असून अनेकांचे जीवही जात आहेत. पण प्रत्यक्षात ही पोकळी भरून न काढण्यात रेल्वे बोर्डाच्या प्लॅटफॉर्मबद्दलच्या नियमाप्रमाणेच जुन्या आणि नव्या गाडय़ांच्या उंचीतील तफावतही कारणीभूत आहे. जुन्या गाडय़ा (डीसी) आणि नवीन सिमेन्स कंपनीच्या गाडय़ा यांच्या रूळांपासून ते फुटबोर्डपर्यंतच्या अंतरात ४ ते ५ इंचांचा फरक आहे. जुन्या गाडय़ा थोडय़ा बुटक्या आहेत. त्यात आता नव्याने मुंबईत येऊ घातलेल्या बंबार्डियर गाडय़ांची ही उंची तर सिमेन्सपेक्षा जास्त असणार आहे.
याबाबत ‘लोकसत्ता’ने प्रत्यक्ष डीसी लोकल आणि सिमेन्स लोकल यांच्या रुळापासून फुटबोर्डपर्यंतची उंची तपासली असता सिमेन्सची गाडी डीसी लोकलपेक्षा चार ते पाच इंचांनी उंच असल्याचे आढळले. डीसी गाडीचा फुटबोर्ड रुळापासून ३ फूट ८ इंच (११५ सेंमी) उंचीवर आहे. तर सिमेन्स गाडीचा फुटबोर्ड ४ फूट ४ इंच (१३४ सेंमी) उंच आहे. म्हणजेच डीसी गाडी प्लॅटफॉर्मवर उभी राहिल्यावर प्लॅटफॉर्म व फुटबोर्ड यांच्यातील उंची १२ ते १५ इंच (३९ ते ३१ सेंमी) असते. तर सिमेन्स गाडीच्या बाबत पोकळी १९ इंच ते २२ इंच (५० ते ५८ सेंमी) असते. परिणामी सिमेन्सच्या गाडय़ा व प्लॅटफॉर्म यामधील पोकळी जीवघेणी ठरत आहे.
याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याशी संपर्क साधला असता लोकलची कमाल उंची आणि प्लॅटफॉर्मची कमाल उंची यांबाबतच्या नियमांचे पालन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बंबार्डिअर गाडीच्या उंचीबाबतचे कागद आपल्याकडे आले असून त्याची योग्य तपासणी केल्याशिवाय या गाडय़ांना हिरवा कंदील देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या रेल्वे बोर्डाने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी सैद्धान्तिक मान्यता दिली आहे. या मान्यतेनुसार आता रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची ९२ सेंटिमीटर करण्यात येणार आहे. पण प्लॅटफॉर्मची उंची निश्चित असताना नवीन रेकची मागणी नोंदवताना रेल्वेने डब्यांच्या उंचीबाबतही निश्चित परिमाण कळवायला हवे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रवक्ते नंदकुमार देशमुख यांनी केली.

* प्लॅटफॉर्मची उंची रेल्वे रूळांपासून ७६ ते ८४ सेंटिमीटर या दरम्यान असावी, असा रेल्वे बोर्डाचा नियम आहे.
* या निकषामुळे जुन्या गाडय़ा आणि रेल्वे प्लॅटफॉर्म यांच्यात एक फुटापेक्षा कमी, तर नवीन सिमेन्सच्या गाडय़ा आणि प्लॅटफॉर्म यांच्यात दीड फुटाची पोकळी राहते.
* मात्र नव्या गाडय़ा बनवण्याची मागणी नोंदवताना संबंधित कंपनीला प्लॅटफॉर्मच्या उंचीसाठीचा निकष सांगणे आवश्यक असते. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज असते.
* प्रत्यक्षात नव्या सिमेन्स आणि आता बंबार्डिअर गाडय़ांची मागणी नोंदवताना हे केले नसल्याचे मध्य रेल्वेतील एका बडय़ा अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.

रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
तीन वर्षांत ७४ स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार
मुंबईत आल्यापासून आपल्याला भेटलेल्या प्रत्येक शिष्टमंडळाने मुंबईतील प्लॅटफॉर्मच्या उंचीची समस्या आपल्या कानावर घातली आहे. या गंभीर समस्येची तड लावण्यासाठी येत्या तीन वर्षांत मुंबईच्या उपनगरीय सेवेतील ७४ स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. कल्याण ते लोकमान्य टिळक टर्मिनस या टप्प्यातील डीसी-एसी परिवर्तन आणि चार नव्या गाडय़ांचे लोकार्पण अशा सोहळ्यासाठी ते शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे उपस्थित होते.
मुंबईतील रेल्वे अपघातांबाबत रेल्वे असंवेदनशील आहे, असे चित्र तयार करण्यात आले आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. प्लॅटफॉर्मच्या उंचीचा प्रश्न प्रवाशांच्या अधिक जिव्हाळ्याचा आहे. परिणामी या प्रश्नाची तड आता लवकरच लावण्यात येईल. त्यासाठी पुढील दोन वर्षांत मुंबईतील ७४ रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येईल, असे खरगे म्हणाले.  रेल्वेकडे निधीची कमतरता आहे. प्रवासी उत्पन्नातूनही रेल्वेला फायदा होत नाही. त्यामुळे प्रथमोपचार सुविधा, रुग्णवाहिकेची सोय, इतर सुविधा यांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेही खरगे म्हणाले. त्यासाठी राज्य सरकारने मुंबईत असलेल्या मोठमोठय़ा उद्योजकांना ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’द्वारे निधी देण्यास प्रवृत्त करायला हवे. प्रसाधनगृहे, शौचालये आदी सुविधा रेल्वे देत असते. मात्र इतर संस्थांनीही आपला वाटा उचलायला हवा, असेही त्यांनी सुचवले.
डीसी-एसी परिवर्तनामुळे मुंबईच्या रेल्वे सेवेत एक नवा अध्याय सुरू झाला आहे. या परिवर्तनामुळे मुंबईही देशातील सर्व एसी प्रवाहाच्या रेल्वेच्या विभागांशी जोडली गेली आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसहून एसी इंजीनसह लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणार असल्याने इगतपुरी येथील त्यांचा इंजीन बदलण्याचा वेळ वाचणार आहे. यामुळे १५ ते २० मिनिटांची बचत होईल, असेही ते म्हणाले.

पाच लाखांची मोनिकाला मदत
मोनिका मोरे या तरुणीला झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी असून विशेष बाब म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी रेल्वेतर्फे तिला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच मुंबईतील इतर संस्थांनीही तिच्या वैद्यकीय उपचारासाठी पुढे यावे, असे आवाहनही केले. राज्य सरकारनेही मोनिकाला मदत देऊ केली आहे. आम्ही ही विशेष बाब मानतो. त्यापोटीच मोनिकाला ही मदत देऊ केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मोनिकासारखे हजारो प्रवासी रेल्वेच्या चुकीमुळेच जखमी होतात. त्यांच्यासाठी रेल्वे काय करणार, या पत्रकारांच्या प्रश्नाला खरगे यांनी सोयीस्करपणे बगल दिली.