मध्यरात्रीच्या अंधारात शिवाजी पार्कवरील हालचाली वाढू लागल्या. एखादी गुप्त कारवाई सुरू व्हावी, तसे वातावरण पसरले. प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांना मज्जाव करण्यात आला. फोटो न काढण्याची सक्त ताकीदही देण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेला चारी बाजूंनी कापडे लावून ती जागा झाकून घेण्यात आली. त्या चौथऱ्याभोवती शिवसैनिकांची मानवी साखळी तयार करण्यात आली. काही ट्रक आणि जेसीबी दाखल झाले.  शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्काराची जागा मोकळी करून पालिकेच्या ताब्यात देण्यावरून शिवसेनेने महिनाभर बराच घोळ घातला होता. सतरा डिसेंबरला सदर जागा रिकामी करून देण्याच वायदाही केला होता. प्रत्यक्षात अठराच्या मध्यरात्री चौथरा हटविण्याचे काम सुरु करण्यात आले आणि पहाटे चापर्यंत चौथऱ्याची जागा मोकळी करण्यात आली. काढलेल्या चौथऱ्याची माती भरून निघालेले ट्रक शिवाजी पार्कलगतच्या समुद्रकिनारी गेले, आणि तेथे रिकामे झाले.  
शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत एकीकडे चौथरा हटविण्यात येत होता त्याचवेळी शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारील मोकळ्या जागेत एक ट्रक येऊन उभा राहिला. या ट्रकमधून विटांचे चौथरे, लोखंडी सळ्या आणि साखळ्या उतरविण्यात आल्या आणि पोलीस सावध झाले. उपायुक्त धनंजय कुलकर्णी तातडीने तेथे जाऊन उभे राहिले. पाठोपाठ काही पोलीस आले. एकीकडे शिवसैनिक जमू लागले तर दुसरीकडे पोलिसांनी संख्याबळ बाढविण्यास सुरुवात केली. हेल्मेट व लाठय़ा घेतलेल्या पोलिसांनी या मोकळ्या जागेवर कडे केले, आणि शिवसैनिकांचा तो घोळका भांबावला.. आता मोकळ्या जागेवर उद्यान उभारायचे कसे असा प्रश्न  निर्माण झाला. पोलिसांनी शिवाजी पार्कचा संपूर्ण परिसर काही क्षणातच व्यापून गेला आणि उद्यानरुपी स्मारक तयार करण्याचा डाव तडीस नेणे अशक्य होऊ लागल्याचे तेथे उपस्थित असलेल्या सेनेच्या नेत्यांच्या लक्षात आले. शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई, महापौर सुनील प्रभू, माजी खासदार मोहन रावले, विभागप्रमुख सदा सरवणकर यांना काही क्षण काय करावे ते समजेनासे झाले. मग  शिवसैनिकांनी पोलिसांच्या नावे उद्धार करण्यास सुरुवात केली. आझाद मैदानावर तुम्ही काय केले? शिवसेनाच त्यावेळी तुमच्या पठीशी उभी राहिली.. असे सांगत काही शिवसैनिकांची पोलिसांचा उद्धार सुरु केला, पण तेव्हा सुभाष देसाई, महापौर आदींनी काढता पाय घेतला होता. उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हातळली. अखेर आपले काही चालत नाही हे लक्षात येताच उद्यानाच्या बांधकामासाठी आणण्यात आलेल्या तयार विटा, लोखंडी सळ्या पुन्हा ट्रकमध्ये भरून महापौर बंगल्यावर नेऊन टाकण्यात आले. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा एवढय़ा गोपनीय पद्धतीने रिकामी का करण्यात आली हे तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनाही समजत नव्हते. जेथे कालपर्यंत हजारो लोक दर्शनासाठी येत होते तेथेच एखादी गुप्त कारवाई केल्याच्या थाटात चौथरा हलविला गेला. सेनेच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार पहाटेच्या अंधारात चौथरा हटवतानाच स्मारकाच्या नावाखाली बगीचा तयार करण्याची योजना सेनेच्या चाणाक्यांनी आखली होती मात्र पोलिसांच्या हुषारीमुळे ही योजना फसली.