कर्ज मंजुरीसाठी एचडीआयएलकडून दलाली मिळाल्याचा संशय

मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी संचालक सुरजितसिंह अरोरा (६५) कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. आर्थिक परिस्थितीबाबत पूर्ण जाणीव असूनही त्यांनी एचडीआयएल कंपनीला मोठय़ा रकमांची कर्ज उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी न्यायालयाला दिली. तसेच कर्ज मंजूर केल्याबद्दल अरोरा यांना एचडीआयएल कंपनीकडून दलाली मिळाल्याचा संशयही व्यक्त केला.

अरोरा यांना न्यायालयाने २२ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य आरोपी जॉय थॉमस यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

बुधवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने अरोरा यांना अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी अरोरा यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. अरोरा तीनवेळा बँकेच्या कर्ज मंजुरी समितीचे सदस्य होते. त्यांच्या निर्णयांना विरोध होत नसे. त्यामुळे एचडीआयएल कंपनी घेतलेले कर्ज फेडू शकणार नाही हे माहीत असूनही त्यांनी समितीसमोर आलेल्या कर्ज प्रस्तावांना मंजुरी देत आपल्या पदाचा गैरवापर केला. या बदल्यात त्यांना कंपनीकडून मोठय़ा रकमांचे बक्षीस मिळाल्याची माहिती पुढे आली असून त्याची खातरजमा करत आहोत, असे आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले. कर्ज घोटाळ्याचा तपास कागदोपत्री पुराव्यांवर अवलंबून आहे. त्यासाठी संशयित आरोपीच्या पोलीस कोठडीची काहीही आवश्यकता नाही. तसेच आतापर्यंतच्या तपासातून नवी, वेगळी माहिती उघड झालेली नाही, असा दावा करत अरोरा यांच्या पोलीस कोठडीला बचावपक्षाचे वकील अ‍ॅड. रिझवान र्मचट यांनी विरोध केला.

बँकेचे अन्य संचालकही संशयाच्या भोवऱ्यात असताना त्यांना का अटक केली जात नाही, असा सवालही अ‍ॅड. र्मचट यांनी उपस्थित केला. तेव्हा अन्य संचालक फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.