करोनाची भीती दूर सारून कर्मचाऱ्यांकडून देखभाल; मात्र ग्रंथालयांना वाचकांची प्रतीक्षा

नमिता धुरी, लोकसत्ता

आर्थिक वाताहत सोसणाऱ्या राज्यभरातील सार्वजनिक ग्रंथालयांसमोर आणखी एक आव्हान उभे राहिले आहे, ते म्हणजे आपली ग्रंथसंपदा जपण्याचे. चार महिने उलटून गेले, टाळेबंदी शिथिल झाली तरीही सरकार ग्रंथालये सुरू करण्याचे नाव काढत नाही याबद्दल ग्रंथालय चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बरेच दिवस बंद असलेल्या वास्तूमध्ये हवा खेळती न राहिल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. शिवाय पावसाळ्याचे दिवस असल्याने गळती लागण्याची शक्यता असते. त्यामुळे कर्मचारी करोनाची भीती बाजूला सारून ग्रंथांच्या काळजीपोटी ग्रंथालयांमध्ये ये-जा करत आहेत.

‘दादर सार्वजनिक वाचनालया’त एक लाख ३५ हजार ग्रंथ आहेत. मार्चच्या मध्यात ग्रंथालय बंद करण्याचा आदेश आला, तेव्हा ग्रंथमोजणी सुरू होती. टाळेबंदी काही दिवसांनी संपेल, अशी आशा असल्याने पुस्तके  आहे त्या अवस्थेत सोडण्यात आली. ग्रंथालयाचे कर्मचारी डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आदी ठिकाणी राहतात. रेल्वेसेवा बंद असल्याने कोणालाही ग्रंथालयाकडे फिरकता आलेले नाही. ग्रंथालयाची दोन सभागृहे पालिके ने विलगीकरणासाठी घेतल्याने सुरक्षा रक्षकही तेथे राहण्यास तयार नाही. वातानुकू लन यंत्रणा बंद असल्याने ग्रंथालयाच्या खुर्च्याना बुरशी आल्याचे प्रमुख कार्यवाह दत्ता कामठे यांनी सांगितले.

‘दरवर्षी मे महिन्यात पुस्तके  गच्चीत नेऊन उन्हात वाळवली जातात. यावर्षी सर्वच पुस्तके  वाळवता आली नाहीत. कोकणातील हवा दमट असल्याने बंद कपाटात पुस्तकांना ओलसरपणा येतो. त्यामुळे ती सतत हलवावी लागतात. वाळवी येऊ नये म्हणून औषध मारावे लागते. त्यामुळे मी व आमचे कर्मचारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ग्रंथालयात असतो’, असे चिपळूणच्या ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर’चे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी सांगितले. ‘ग्रंथालये बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश असला तरीही वाळवी आदेश मानत नाही, ती आदेशाशिवाय येते. त्यामुळे संपूर्ण टाळेबंदी सुरू असतानाही आम्ही ग्रंथालयात येत होतो आणि अजूनही येत आहोत. शासनाने आमच्यावर गुन्हे दाखल के ले तरी चालतील’, अशी देशपांडे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची भावना आहे. या ग्रंथालयात ७५ हजारांपेक्षाही अधिक ग्रंथ आहेत. यात लोकमान्य टिळक यांच्यासह इतर काही लेखकांची प्रत्यक्ष स्वाक्षरी असलेल्या ३०० पेक्षा अधिक पुस्तकोंचा समावेश आहे.

खेडच्या ‘राजगुरूनगर सार्वजनिक वाचनालया’चे मानद सचिव राजेंद्र सुतार आणि एक कर्मचारी ग्रंथालयाच्या जवळच राहतात. त्यामुळे आठवडय़ातून एक दिवस ग्रंथालयात जाऊन झाडलोट करतात. पुस्तकांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवतात. हवा खेळती राहावी म्हणून दारे-खिडक्या उघडय़ा ठेवतात. अकोटच्या ‘श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालया’चे कर्मचारीही अधूनमधून ग्रंथालयात ये-जा करतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने कु ठे गळती लागलीय का ते पाहाणे, ग्रंथालय हवेशीर ठेवणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष राजेश दांगटे यांनी सांगितले.

किमान सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ग्रंथ देवघेव प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सतत राज्य शासनाकडे करत आहोत. पण अद्याप प्रतिसाद नाही.

– डॉ. गजानन कोटेवार, प्रमुख कार्यवाह, ‘महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ’