एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने मुंबई महापालिकेच्या नावाने ‘क्यूआर कोड’ असलेले ओळखपत्र तयार करून त्याआधारे हार्बर रेल्वेने प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल केल्याची माहिती वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली.

हे ओळखपत्र २०० रुपयांत अँटॉप हिल येथील एका संगणकीय पद्धतीने पॅनकार्ड, आधारकार्ड बनवणाऱ्या दुकानात तयार करण्यात आले होते. याप्रकरणी आणखी एका इसमाला अटक केली आहे, तर एका २१ वर्षीय तरुणीलाही बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.

क्यूआर कोड ओळखपत्रावरून विरार ते चर्चगेट असा १९ ऑगस्ट ते १८ सप्टेंबपर्यंतचा दुसऱ्या वर्गाचा पासही काढला होता. बोरिवली फलाटावर तिकीट तपासनीस व पोलिसांनी ओळखपत्र तपासले असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. ही तरुणी मरिन लाइन्स येथील एका खासगी इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई पालिकेच्या नावाचे ओळखपत्र यापूर्वी अमान्य झाल्याने तरुणीने मध्य रेल्वेचे ‘क्यूआर कोड’ आधारित बनावट ओळखपत्र बनविले. ही तरुणी नालासोपारा येथे राहाते.