कारनॅक पूल पाडण्याआधी नवीन पूलबांधणीचा रेल्वेचा प्रस्ताव;
लष्कराच्या अभियांत्रिकी विभागाची मदत घेणार
मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणारा १३५ वर्षे जुना हँकॉक पूल पाडल्यानंतर मध्य रेल्वेने आता १४८ वर्षे जुना कारनॅक पूल पाडण्याच्याही हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र हँकॉक पूल पाडल्यानंतर सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ रेल्वे अपघाताच्या घटना वाढत असल्यामुळे कारनॅक पूल पाडण्याआधी हँकॉक येथे नवीन पूल बांधण्याचा रेल्वेचा विचार आहे. विशेष म्हणजे, यासाठी लष्करातील ‘सॅपर्स’ या पूल अभियांत्रिकी विभागाची मदत घेण्याचा रेल्वेचा प्रस्ताव असून या विभागामार्फत दोन दिवसांत नवीन पूल उभारला जाऊ शकतो. याच विभागाच्या मदतीने कारनॅक पूल पाडण्याचा प्रस्तावही रेल्वेने राज्य सरकारसमोर ठेवला आहे.
डीसी-एसी परिवर्तनानंतर रेल्वेगाडय़ांचा वेग वाढला असला तरी दक्षिण मुंबईतील रुळांवरील पुलांजवळून जाताना गाडय़ांना वेगमर्यादा लावण्यात आली आहे. त्यातच हे पूल प्रचंड जुने झाल्याचे सांगत ते पाडण्याची गरजही रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने व्यक्त केली होती. त्यानुसार जानेवारी महिन्यात विशेष ब्लॉक घेऊन हँकॉक पूल पाडण्यात आला होता. हा पूल पाडल्यानंतर चार महिने उलटून गेल्यावरही अद्याप येथे नवीन पूल उभा राहिलेला नाही. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात याच ठिकाणी रेल्वेरूळ ओलांडताना एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिकांनी रेल्वे रोको आंदोलनही केले होते.
या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, कारनॅक पूल पाडण्यापूर्वी योग्य नियोजन करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे कारनॅक आणि हँकॉक हे जवळजवळ असलेले दोन्ही पूल पाडल्यानंतर याचा फटका स्थानिक वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात बसू शकतो. त्यामुळे कारनॅक पुलाच्या पाडकामास विरोध होण्याचीही भीती आहे. त्यामुळेच रेल्वेने कारनॅक पूल पाडण्याआधी जुन्या हँकॉक पुलाच्या जागी नवीन पूल उभारणीचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला आहे. वास्तविक रेल्वेमार्गावरील बांधकामे रेल्वेने करायला हवीत आणि नालेसफाईसारखी गोष्ट पालिकेने हाताळायला हवी. मात्र येथे पालिकेने हा पूल बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पुलासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याचेही पालिकेतर्फे सांगण्यात आले होते. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने पुण्यातील लष्कराच्या सदर्न कमांडमधील सॅपर्स या पूल बांधण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभियांत्रिकी विभागाकडून येथे पूल बांधून घेण्यात यावा, असा प्रस्ताव रेल्वेने राज्य सरकारसमोर ठेवल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हा विभाग दोन दिवसांत पूल उभा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे पूल लष्कराच्या वाहनांसाठीही वापरता येत असल्याने ते भक्कम असतात. त्यावरून हलकी वाहने नक्कीच जाऊ शकतात. लष्कराकडून हा पूल उभारला जाणार असेल, तर कारनॅक पूल पाडण्याचे कामही त्यांच्यावरच सोपवता येऊ शकते. त्यामुळे हे कामदेखील पटापट होईल. पण हँकॉक येथील पूल उभा राहिल्याशिवाय ते करता येणार नाही, अशी भूमिकाही या अधिकाऱ्याने घेतली. याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकारचा असेल, असेही त्याने स्पष्ट केले.