रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांची ग्वाही; नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रथमच मौन सोडले

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात निर्माण झालेली परिस्थिती.. नव्या नोटांचा होणारा मर्यादित पुरवठा.. बँका आणि एटीएमसमोर लागलेल्या लांबच लांब रांगा.. या सर्व परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर गेल्या तीन आठवडय़ांपासून मौन बाळगून असलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी अखेर रविवारी आपले मौन सोडत ‘लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल’, अशी ग्वाही दिली.

[jwplayer jPX7MVNf]

पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशात निर्माण झालेल्या चलनकल्लोळाच्या पाश्र्वभूमीवर प्रथमच बोलताना पटेल यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थनच केले. ते म्हणाले की, ‘काळ्या पैशाला अटकाव करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय आवश्यकच होता. मात्र, या निर्णयामुळे सामान्यांना होणाऱ्या त्रासाची आम्हाला जाणीव असून त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्नरत आहोत. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल. देशभरातील बँकांना आम्ही पुरेसा चलनसाठा करण्याबरोबरच नोटा छापणाऱ्या कारखान्यांनाही त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.’

पटेल यांचे आवाहन

लोकांनी रोख रकमेऐवजी ‘कॅशलेस’ व्यवहारांवर भर द्यावा, या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाचीच री पटेल यांनीही ओढली. डेबिट कार्डस आणि डिजिटल वॉलेट्स यांचा वापर करून लोकांनी रोख रकमेचे व्यवहार कमी करावेत, असे आवाहन पटेल यांनी केले.

रिझव्‍‌र्ह बँकेने योजलेले उपाय

* एटीएमची पुनर्रचना करण्यासाठी देशभरात ५० हजार तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून ते अहोरात्र काम करत आहेत

* नवीन चलन सगळीकडे उपलब्ध व्हावे यासाठी सर्व बँक व त्यांच्या शाखांना अखंड प्रयत्न करण्याचे निर्देश

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांच्या तुलनेत नवीन पाचशे आणि दोन हजाराच्या नोटांची रचना आणि त्यांची जाडी यांच्याविषयी लोकांना अनेक प्रश्न आहेत. या नोटांवरील रचनेची नक्कल करून बनावट नोटा तयार करता येणार नाहीत, यासाठी ही काळजी घेण्यात आली असल्याचे पटेल म्हणाले. नोटाबदलाचा एवढा मोठा निर्णय जेव्हा होतो तेव्हा जुन्या नोटांच्या जागी उच्च प्रतीच्या नव्या नोटा आणणे हे प्राथमिक उद्दिष्ठ ठरते, असेही पटेल यांनी सांगितले.

लोकांनी बँका आणि एटीएम केंद्रांसमोर लावलेल्या रांगांविषयीही गव्हर्नर पटेल यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, ‘चलनात असलेल्या ८६ टक्के नोटा चलनातून बाद ठरवायच्या आणि तेवढय़ाच प्रमाणात नवीन चलन बाजारात आणायचे हे एक महाकाय आव्हान होते. शिवाय या निर्णयाची कमालीची गोपनीयता बाळगायची होती. एवढे मोठी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा तरी कालावधी लागतोच. त्यामुळेच लोकांना त्यांच्या पैशांसाठी रांगा लावाव्या लागल्या. आता मात्र परिस्थिती निवळत असून अनेक शहरांमध्ये रांगा कमी झाल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात अद्याप परिस्थिती सुधारायची आहे’.

[jwplayer 1G6YlsuX]