भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जाण्याऐवजी घरातूनच अभिवादन करण्याच्या मुंबई महापालिकेच्या आवाहनाला अनुयायांकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या आदल्या दिवशी ५ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर कुणीही गर्दी केलेली नाही. दरम्यान, डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे महापौरांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन करण्यात आले.
पालिकेच्या आवाहनाला अनुयायांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांचे आभार मानले. ही पुस्तिका पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
थेट प्रक्षेपण..
चैत्यभूमीवर ६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शासकीय मानवंदना आणि पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे पालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून व दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीत थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर १० मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 6, 2020 12:32 am