करोना उपचारांबाबत गोंधळ ;

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील खासगी रुग्णालयांमध्ये विशेषत: नर्सिग होममध्ये ‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ (आयसीएमआर) आणि ‘राज्य विशेष कृती दला’ची नियमावली पाळली जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये टोसीलीझुमाब, रेमडेसिवीर यांसारख्या औषधांचा वापर सरसकट केला जातो. त्यामुळे उपचारांचा खर्च अनाठायी वाढतो आणि औषधांसाठी पायपीटही करावी लागते. शिवाय, रुग्णांच्या प्रकृतीवरही या औषधांचे दुष्परिणाम होण्याची भीती त्यांचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत.

ठाकुर्ली येथील ४८ वर्षीय रिक्षाचालकाला खोकल्याचा त्रास वाढल्याने ५ जुलैला रात्री डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. खाट उपलब्ध नसल्याने त्याला ऑक्सिजन लावून दिवसभर बाकावर बसवून ठेवले. त्यानंतर कृत्रिम श्वसनयंत्रणेची (व्हेंटिलेटर) गरज असल्याने रुग्णाची अन्यत्र व्यवस्था करण्यास सांगितले. डोंबिवली, ठाण्यातील कोणत्याही रुग्णालयात कृत्रिम श्वसनयंत्रणा उपलब्ध नसल्याने रुग्णाला मुलुंडमधील खासगी रुग्णालयात ६ जुलैला दाखल केले. दाखल करण्यापूर्वी रुग्णालयाने दीड लाख रुपये भरण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी टोसीलीझुमाब, रेमडेसिवीर अशी ९० हजारांची इंजेक्शन लिहून दिली. हा खर्च परवडणारा नसल्याने अखेर आम्ही मुंबईत केईएम रुग्णालय गाठले, अशी माहिती रुग्णाच्या पत्नीने दिली. के ईएममध्ये या रुग्णावर उपचार सुरू असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेची आवश्यकता भासलेली नाही. अशा परिस्थितीत ९० हजारांच्या इंजेक्शनची खरोखर गरज होती का, असा प्रश्न रुग्णाचे मित्र काळू कोमसकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, कल्याण, डोंबिवली भागात चाचणी अहवाल २४ तासांत दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

छोटय़ा रुग्णालयांवरच भिस्त

ठाण्याचे जिल्हा रुग्णालय आणि करोना रुग्णालय वगळता उपनगरांमध्ये एकही सरकारी रुग्णालय गंभीर रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध नाही. कल्याण, डोंबिवली, वसई, विरार ते अगदी पालघर भागांतील रुग्णही खासगी रुग्णालयांवरच अवलंबून आहेत. यापैकी बहुतांश छोटी नर्सिग होम्स आहेत. तेथील कर्मचारीही अप्रशिक्षित असतात, असे सांगितले जाते.

नियमावलीबाबत संपर्क साधा-डॉ. पंडित

करोना संसर्गावर प्रभावी औषध नसल्याने ‘आयसीएमआर’च्या नियमावलीसह मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील तज्ज्ञांच्या सूचना लक्षात घेऊन ‘राज्य विशेष कृती दला’ने नियमावली तयार केली आहे. याबाबत शंका असल्यास रुग्णालयांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे राज्य विशेष कृती दलातील डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले. तर खासगी रुग्णालयांतील उपचारांवर देखरेख करणारी यंत्रणा सध्या तरी उपलब्ध नाही. यासाठी जिल्हा स्तरावर नुकतीच विशेष कृती दलाची स्थापना करण्यात येत असल्याचे पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले.

‘त्या’ औषधांची सर्वाना गरज नाही !

गंभीर प्रकृतीच्या सर्व रुग्णांना टोसीलीझुमाब, रेमडेसिवीर यांसारख्या औषधांची आवश्यकता असते का, याचे उत्तर देताना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी, टोसीलीझुमाब इंजेक्शन संसर्गाच्या विशिष्ट टप्प्यावर (सायटोकाइन स्टॉर्म सिन्ड्रोम) देणे आवश्यक असते, असे स्पष्ट केले.