|| शैलजा तिवले

पालिकेकडून डॉक्टरांची समिती नियुक्त; वैद्यकीय पथकांसाठी सुरक्षा साधने

मुंबई: शहरातील पालिकेच्या रुग्णालयात फिरत्या कृत्रिम श्वसनयंत्रणा, उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने(पीपीई) मागविण्यासाठी लवकरच पालिकेकडून निविदा काढण्यात येणार आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक साहित्य, औषधे यांची नेमकी मागणी निश्चित करण्यासाठी पालिकेने चार प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नियुक्त केली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आठवडाभरातच १४ वरून ७० वर पोहचली आहे. आठवडाभरात पाच पटीने वाढलेली रुग्णसंख्या पुढील काळात झपाटय़ाने वाढण्याची शक्यता आहे. करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सध्या पुरेसे मास्क, पीपीई, इतर वैद्यकीय साहित्य, औषधे असली तरी नजीकच्या काळात याचा तुटवडा भासू शकतो, यादृष्टीने पुढील काळात नेमकी किती मागणी आहे, याचा आढावा पालिका घेत आहे. यासाठी केईएम, लोकमान्य टिळक, नायर आणि कूपर रुग्णालयातील औषधशास्त्र, बालरोग,  श्वसनरोग, अतिदक्षता अशा चार विभागातील १६ डॉक्टरांची समिती तयार केली आहे. या समितीकडून आवश्यक साहित्याची यादी पालिकेला दिली जाणार आहे.

साहित्याची यादी करताना पैशाचा कोणताही विचार करू नये. रुग्णालयांच्या निधीतून शक्य नसल्यास पालिका दुसऱ्या निधीतून ही मागणी पूर्ण करेल, असे समितीला सांगितले. यादी आल्यानंतर सोमवारी तातडीने निविदा काढून हे साहित्या मागविले जाईल. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली तरी त्यांना उपचार देण्यात कमतरता भासणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

पालिका रुग्णालयातील सर्व अनावश्यक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याने सध्या ५०० श्वसनयंत्रणा उपलब्ध केलेल्या आहेत. अजून आवश्यक यंत्रणांची मागणी करण्याचे समितीला सूचित केले आहे. त्यानुसार भविष्याच्या दृष्टीने फिरत्या कृत्रिम श्वसनयंत्रणा पालिका खरेदी करणार आहे.

२००० खाटांचे विलगीकरण कक्ष उपलब्ध

पालिकेच्या सध्या उपलब्ध असलेल्या विलगीकरण कक्षांव्यतिरिक्त प्रसूतीगृहे आणि बालकांची रुग्णालये वगळता आता सर्वच उपनगरीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची सुविधा निर्माण केली जात आहे. यातून २ हजार खाटा लवकरच उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती काकाणी यांनी दिली.