सतीश राजवाडे, दिग्दर्शक, अभिनेते

पुस्तक हे मानवी कल्पनाशक्तीला चालना देणारं उपकरण आहेअसं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. वाचनाने केवळ ज्ञानच मिळत नाही तर व्यक्तिची जडणघडण होत असते. त्यामुळेच अनेक नामवंत व्यक्ती आपल्या कामगिरीचे श्रेय वाचनसंस्कारांनाही देतात. पण नामवंत मंडळी नेमकं काय वाचतात? हे जाणून घेणारे नवे पाक्षिक सदर आजपासून..

खरे सांगायचे तर मला लहानपणी पुस्तके वाचायची आवड नव्हती, पण माझ्या एका मित्रामुळे मला वाचायची गोडी लागली. एकदा त्याने त्याच्याकडील एक पुस्तक मला वाचायला दिले आणि मला वाचनाची चटक लागली. वाचायला सुरुवात केली. माझे आई-बाबा विलेपार्ले येथे हनुमान रस्त्यावर असलेल्या एका ग्रंथालयाचे सदस्य होते. त्या ग्रंथालयातून पुस्तके आणून वाचायला लागलो. अनेकदा खाली मित्रांबरोबर खेळायला न जाता मी घरीच पुस्तके वाचत असे. पुढे लोकमान्य सेवा संघाच्या ग्रंथालयाचा सदस्य झालो. सध्या आता मी कोणत्याच ग्रंथालयाचा सदस्य नाही. पण कुठेही गेलो तरी माझ्या बॅगेत एखादे पुस्तक तरी असतेच असते. कामातून मला जसा वेळ मिळेल, तसे मी वाचत असतो. माझे पहिल्यापासूनच इंग्रजी पुस्तकांचे वाचन जास्त आहे. मात्र असे असले तरी मराठी पुस्तकेही मी आवर्जून वाचतो. वाचनाची एकदा गोडी लागल्यानंतर मला जितके मिळेल ते सर्व मी वाचत गेलो आणि त्या विविध पुस्तकांच्या वाचनामुळे मी माणूस म्हणून घडत गेलो.

मला ‘फिक्शन’ हा प्रकार वाचायला आवडतो. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे मराठी वाचनाचा वेग थोडासा कमी आहे. पण तरीही मराठी पुस्तके मी वाचतोच वाचतो. विविध प्रकारचे वाचन केल्यामुळे साहित्यविश्वात काय चालले आहे, साहित्यातील नवे प्रवाह काय आहेत, नवे लेखक कोण आहेत, त्यांचे नवीन लेखन काय या सगळ्याची माहिती होते. शेरलॉक होम्स प्रचंड प्रमाणात वाचला आहे, अजूनही वाचतो. डॅनियल स्टील यांचीही अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यांचे लेखन वाचताना त्या त्या व्यक्तिरेखांच्या प्रतिमा डोळ्यासमोर आपोआप तयार होतात. माझा दिग्दर्शक म्हणून पाया बहुधा तेव्हाच पक्का झाला असावा. पुस्तके वाचताना जो लेखक प्रसिद्ध आहे, त्याचीच पुस्तके वाचायची आणि तुलनेत कमी प्रसिद्ध असलेल्यांची वाचायची नाहीत, असे माझे नसते. जे जे मिळेल आणि आवडेल ते ते मी वाचतो.  ‘आर्ची कॉमिक्स’, ‘हार्डी बॉइज’ यांचेही खूप वाचन केले आहे. शालेय वयात आई-वडिलांनी मी आणि माझ्या भावासाठी ‘रीडर्स डायजेस्ट’ची वर्गणी भरली होती. ते नियमित आमच्या घरी येत होते. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांच्या ‘माय फ्रोजन ट्रबल’ या पुस्तकाचा ‘धुमसते पर्व’ हा मराठी अनुवादही वाचला आहे. मुरलीधर खैरनार लिखित ‘शोध’, जगन्नाथ कुंटे यांचे ‘नर्मदे हर’ हे पुस्तकही वाचले. तो अनुभव वेगळा होता. जी. ए. कुलकर्णी हे माझे आवडते लेखक आहेत. जीएंचे ‘पिंगळावेळ’ हे माझे एक आवडते पुस्तक आहे. सुहास शिरवळकर यांचीही पुस्तके वाचली असून तेही आवडते लेखंक आहेत. ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांवरील पुस्तकांचेही वाचन मी केले आहे. ‘असंभव’ मालिका करताना ज्योतिष, पुनर्जन्म या विषयावर माझे वाचन अधिक प्रमाणात झाले. ती मालिका करताना मला त्या विषयांवरील पुस्तकांचा विषय मांडण्यासाठीही खूप फायदा झाला.

लहानपणी माझ्या मित्राने मला ‘स्पीकिंग ट्री’ हे पुस्तक भेट दिले होते. अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून खूप मोठा विचार साध्या व सोप्या भाषेत यातून मांडण्यात आला होता. इंद्रजाल कॉमिक्स, अमर चित्रकथा यांचेही लहानपणी खूप वाचन केले. पी. जी. वुडहाऊसही वाचले आहे. मानवी भावभावना, नातेसंबंध याच्याशी मी पहिल्यापासूनच जवळ आहे. काय केले तर लोक दुखावले जातील यापेक्षा काय करू नये हे वाचनातून शिकत गेलो. जितके मिळत गेले तितके मी वाचत गेलो. डॅनियल स्टील यांच्या पुस्तकांनी मला खूप प्रेरणा दिली. जीवनात आपण यशस्वी झाल्यानंतर नव्याने अनेक माणसे जोडली जातात. पण आपण कोणी नसताना, अगदी शून्यातून सुरुवात करत असताना, आपल्या पडत्या काळात किंवा आपल्या सुख-दु:खातही जी माणसे आपल्या जवळ राहतात, त्यांना कोणत्याही परिस्थितीत दुखावणे हे योग्य नाही. ते चुकीचे आहे. असे त्यांच्या लेखनातून नेहमी दिसून येते. त्यांच्या लेखनातून हे शिकायला मिळाले.

आत्ताची पिढी वाचत नाही, त्यांना वाचनाची आवड नाही, असे म्हटले जाते. पण मला तसे वाटत नाही. काळानुरूप वाचनाची आवड, स्वरूप बदलले आहे. त्यामुळे आजही मुले वाचतात. ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते. ते खरेच आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढे वाचायला मिळेल तेवढे वाचा. विविध विषयांवरचे वाचन करा. क्रिकेट सामन्यातील पंच डिकी बर्ड यांचे आत्मचरित्र आता वाचायचे आहे. बदलत्या काळानुसार ‘किंडल’वरही मी पुस्तके वाचतो. पण पुस्तके हातात घेऊन वाचण्याचा जो आनंद आहे, पान उलटण्याचे जे समाधान आहे ते त्या वाचनातून मिळत नाही.