मे महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून शाळेची पहिली घंटा खणाणणार आहे. राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन केले जाणार आहे; तर शाळेत या वेळी फेरीचे आयोजनही करण्यात येणार आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने स्वागत झाल्यानंतर अनुदानित शाळांमध्ये वह्य़ा, पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. सरकारतर्फे राज्यातील ९५ टक्के शालोपयोगी साहित्य आणि अभ्यास साहित्याचे वाटप शाळांमध्ये करण्यात आल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
शाळांमध्ये सर्व साहित्य पोहोचल्याचा दावा शासन करीत असले तरी इयत्ता पाचवीच्या स्वाध्याय पुस्तिका अद्याप शाळांमध्ये पोहोचलेल्या नाहीत. शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पाचवी ही उच्च प्राथमिकमधून प्राथमिकमध्ये आणण्यात आली आहे. यामुळे त्याच्या स्वाध्यायाचे स्वरूपही प्राथमिकप्रमाणेच असेल. यामुळे स्वाध्याय पुस्तिकांबाबत गोंधळ असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.