मुंबईत शहरात १६ ठिकाणी ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्याचे काम मिळालेला कंत्राटाने वेळेत प्लॉन्ट उभारलेले नसताना त्यांना ३२० कोटीचे दुसरे काम देण्यात आले. मुंबईत महापालिकेत गैरव्यवहार सुरु असून हे कंत्राट रद्द करण्याची आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार अमित साटम यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेने ऑक्सीजन प्लॉन्ट उभारण्याचे ८४ कोटीचे कंत्राट हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेले आहे. मुंबई शहरात १६ ऑक्सिजन प्लॉन्ट उभे करण्यात येणार आहेत. ३० दिवसांच्या कालावधीत हे काम पूर्ण करायचे होते. आता ३२ दिवस पूर्ण होवून देखील अजून हे काम पूर्ण झालेले नाही. ८४ कोटीचे दिलेले काम पूर्ण झालेले नसताना मुंबई महापालिकेने ३२० कोटी रुपयांचे नवे काम पुन्हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या एका मंत्र्याने प्रश्न उपस्थित केला आहे.

यापूर्वीही हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने मुंबईतील राणीच्या बागेत पेंग्विनचे इनक्लोझर बनवण्याचे काम केले होते. पुन्हा त्याच कॉन्ट्रक्टरला पुन्हा ऑक्सिजन प्लॉन्ट उभा करण्याचे काम देण्यात आले आहे. ते पूर्ण झाले नसताना पुन्हा दुसरे ३२० कोटीचे काम देण्यात आले आहे. अशाप्रकारचा कोणती पेंग्विन गँग मुंबई महापालिकेत आहे आणि कोण वाझेगिरी आणि भ्रष्टाचार करत आहे, असा सवाल आमदार अमित साटम यांनी केला आहे. तसेच त्यांनी ताबडतोब हे कंत्राट रद्द करावं, कंत्राटादाराविरुद्ध एफआयआर नोंदवावा आणि पुढील ३२० कोटीचे काम रद्द करावे, अशी विनंती महापालिका आयुक्तांना केली आहे.