‘शिवसेना २५ वर्षे युतीतच सडली’, असे सांगत भाजपसोबतची युती ठोकरून स्वबळावर लढण्याचे जाहीर करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नव्या कथित पवित्र्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. यापुढे युती होणे नाही, असे आजवर शेकडो वेळा सांगून पुन्हा बंद दरवाजाआड युतीचीच चर्चा करावयाच्या ठाकरे यांच्या नीतीमुळे सेनेप्रमाणे भाजपमध्येही अचंबा व्यक्त होत आहे.
यापुढे मी युतीसाठी कटोरा घेऊन कुणाच्याही दारात जाणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या अगोदरच जाहीर केल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. गेल्याच महिन्यात, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याचा प्रस्तावच संमत करण्यात आला होता. निवडणुका एकत्र होवोत वा न होवोत, आपण सज्ज आहोत, अशी ग्वाही देऊन काही आठवडे उलटण्याआधीच, बंद दरवाजाआड ठाकरे यांनी फडणवीस यांना संभाव्य युतीच्या अनुकूलतेचे संकेत दिल्याच्या बातम्या पसरू लागल्याने शिवसैनिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
याआधी अनेकदा ठाकरे यांनी युती संपल्याच्या घोषणा केल्या होत्या. भविष्यात युती करायची की नाही हे शिवसेना ठरवेल, असे उद्धव ठाकरे यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी, २४ एप्रिल २०१६ रोजी जाहीर केले, तेव्हाही सेनेमध्ये उत्साहाचे वातावरण होते. भाजपसोबत युती करण्याने सेनेच्या सत्ताकारणातील संधी संकुचित होतात, त्यामुळे युती नकोच, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. मात्र, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यास सेना-भाजप मतविभागणीचा फायदा त्यांना मिळेल हे लक्षात घेऊन युतीची गरज शिवसैनिकांनी स्वीकारली होती. तरीही, भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या खच्चीकरणाचे प्रयत्न होत असल्याची खदखद शिवसेनेत नेहमीच उफाळून येत होती. ही खदखद ओळखूनच, सेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा ठरावच संमत केला होता.