आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि युतीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शनिवारी पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांत स्वतंत्र बैठका सुरू होत्या. शिवसेनेने आपला प्रस्ताव दिला असून भाजप त्यावर निर्णय घेईल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले होते. मात्र, शनिवारी सकाळी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी आपल्याकडे अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव आलाच नसल्याचे सांगितले. भाजपकडून विधानसभेसाठी काही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, रविवारी पक्षाच्या संसदीय बोर्डासमोर ही नावे मंजूरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती ओम माथूर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.
तर, शिवसेनेकडून जागावाटपासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यासाठी रविवारी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली असून, या बैठकीत उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपने आज दिवसभरात महायुतीतील विनायक मेटे, महादेव जानकर या घटकपक्षांतील नेत्यांच्या भेटी घेऊन जागावाटपासंदर्भातील पर्यायांवर चर्चा केली. शनिवारी दुपारच्या सुमारास पुनम महाजन यांच्या घरीदेखील शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मात्र,  जागावाटपासंदर्भात शिवसेना-भाजपमध्ये अजूनपर्यंत समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. सध्या ओम माथूर यांच्या निवासस्थानी भाजपच्या सुकाणू समितीची आणखी एक बैठक सुरू आहे.