01 March 2021

News Flash

देशात अराजक, मोदी ‘चॉपस्टिक’ दांडिया खेळण्यात मग्न-शिवसेना

शिवसेनेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

देशाच्या चार प्रमुख स्तंभांना चॉपस्टिकच्या काड्यांएवढीही किंमत उरलेली नाही. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चॉपस्टिकने कसे खायचे याची धडे घेत आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेजवानी दिली. यामध्ये त्यांनी पंतप्रधानांना चॉपस्टिकने कसे खायचे याचे प्रशिक्षण दिले. पंतप्रधान हे धडे घेत असताना इथे देशाच्या राज्यव्यवस्थेच्या चार प्रमुख स्तंभांच्या काड्याच झाल्या आहेत असे म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. सीबीआय संचालकांच्या बदलीवरून पंतप्रधानांवर पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे.

अराजक किंवा यादवी या शब्दांची धार बोथट वाटावी अशा घटना राष्ट्रीय स्तरावर घडत आहेत. टांगा पलटी घोडे फरार अशी एकंदरीत दिल्लीतील राज्यवस्थेची अवस्था झालेली दिसते. सर्वोच्च न्यायालयाच्या चार प्रमुख न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली आणि बंडाच्या तोफा उडवल्या. आता सीबीआयमध्ये तशाच बंडाच्या हादऱ्यांनी कल्लोळ माजला आहे. संरक्षण खाते व अंमलबजावणी संचलनालय यामधल्या काही अधिकाऱ्यांनाही सक्तिच्या रजेवर पाठवण्याच्या घटनाही याच बंडाच्या प्रक्रियेचा भाग आहेत. देशाच्या चार प्रमुख संस्थांनी सरकारच्या जुमलेशाही विरोधात भूमिका घेतली आहे. हे सगळे आपल्या देशात घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये पोहचले होते. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी त्यांना मेजवानी दिली. प्लॅस्टिकच्या काड्यांनी म्हणजेच चॉपस्टिकने कसे खावे याचे प्रशिक्षण दिले. इकडे देशात अराजकसदृश परिस्थिती असताना जपानमध्ये मोदी चॉपस्टिक दांडिया खेळताना दिसत होते.

सीबीआयचे संचालक आलोक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे व त्यांची चौकशी आता निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात येईल. मोदी सरकारने नेमलेले विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी प्रधानमंत्री कार्यालयाच्या नावावर जो सरळ हस्तक्षेप केला त्यातून वर्मा विरुद्ध अस्थाना असे टोळीयुद्धच सीबीआयमध्ये सुरू झाले. एकमेकांच्या माणसांना अटक करण्यापासून ते कार्यालयावर धाडी घालण्यापर्यंत तमाशे झाले. त्यात राष्ट्रीय सुरक्षा व प्रशासनाचे धिंडवडे निघाले. ‘सीबीआय’ हे सरकारच्या हातचे बाहुले आहे असे नेहमीच म्हटले गेले, पण त्या बाहुल्यावर थेट व्यक्तिगत मालकी राहावी असे प्रयत्न सुरू झाले. सीबीआयमध्ये क्रमांक एक आणि दोनचा वाद हा जाणीवपूर्वक निर्माण केलेला वाद आहे. वर्मा हे संचालक असताना अस्थाना हे त्यांच्या कामात अडथळे आणत होते यामागे नक्कीच कुणीतरी प्रेरणादायी शक्ती असायला हवी.

राहुल गांधी यांनी सीबीआयमधील वादाचा विषय राफेल प्रकरणाशी जोडला आहे. आलोक वर्मा हे राफेल प्रकरणाची चौकशी करू पाहत होते व त्यांनी त्यासंदर्भात काही महत्त्वाची माहिती मिळवली. ते अधिक पुढे जाऊ नये यासाठी अस्थाना यांच्या माध्यमातून वर्मा यांच्यावर हल्ला केला असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. मोदी जपानमध्ये चॉपस्टिक काड्यांनी कसे खायचे याचे धडे घेत आहेत. इकडे भारतीय राज्यव्यवस्थेच्या चार प्रमुख स्तंभांच्याही आता ‘काड्या’च झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 5:00 am

Web Title: shiv sena criticized pm narendra modi on cbi and other issues in saamna editorial
Next Stories
1 ‘निवडणुका जवळ आल्या की भाजपाला राम मंदिराची आठवण’
2 हिंदू राजा होता तोपर्यंत काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित होते-योगी आदित्यनाथ
3 संसदेचे अधिवेशन तातडीने बोलवा!
Just Now!
X