21 January 2021

News Flash

शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही; उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत – राणे

हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही, असं देखील म्हणाले आहेत.

संग्रहीत

“शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही, गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवं ते करणारे आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही.” असा घणाघात भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच, आमदार राम कदम यांच्या जनआक्रोश यात्रेला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं.

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी, आज भाजपा आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र, ही यात्रा निघण्या अगोदरच राम कदम यांना पोलिसांनी त्यांच्या निवास्थानावरून ताब्यात घेतलं होतं. यानंतर भाजपा नेते नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी राम कदम यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाणे गाठलं होतं. यानंतर नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधला.

आणखी वाचा- हा संघर्ष थांबणार नाही, येणाऱ्या काळात लोकं रस्त्यावर उतरणार – राम कदम

महाराष्ट्रात सरकारमध्ये  क्षमता नाही –

यावेळी राणे म्हणाले की, ”पालघरमध्ये साधुंची जी हत्या झाली. ज्या प्रकार झाली. त्यानंतर सरकारने त्या अत्याचाराबद्दल जे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात योग्य कारवाई न केल्याने, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी आमदार राम कदम यांनी हे आंदोलन केलं आहे. भारत हा साधु-संतांचा देश आहे, इथं त्यांच्यावर अत्याचार नाही झाले पाहिजे, अशी सर्वांचीच भावना आहे. त्यामुळेच भाजपा आमदार राम कदम यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. आम्ही त्यांना संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत. त्यांची जी मागणी आहे की, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं, याबद्दल देखील आम्ही सहमत आहोत. आम्ही असं समजतो की हे जे सध्या महाराष्ट्रात सरकार आहे, त्यांची क्षमता नाही किंवा ते या साधुंना न्याय मिळावा या मताचे नाहीत.”

हिंदू धर्माविरोधात जाण्यासाठीच ते मुख्यमंत्री बनले –

यावेळी राज्य सरकार हिंदू विरोधी आहे का? असा प्रश्न राणेंना विचारण्यात आल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, ”ज्या दिवशी त्यांनी भाजपाबरोबर गद्दारी करून, ते स्वतः मुख्यमंत्री होऊन बसले. तर तुम्ही समजलं पाहिजे की, हिंदू धर्माविरोधात जाण्यासाठीच ते मुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत हातमिळवणी केली व हिंदुत्वाचा त्याग केला. मग त्यांच्याकडून साधू-संतांचे रक्षण करण्याची काय अपेक्षा करणार?”

आणखी वाचा- …यालाच म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्या तोंडाला काळं फासणं – सचिन सावंत

उद्धव ठाकरे कुठल्याही परीक्षेला बसत नाही आणि …-

आमचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असं शिवसेना म्हणत असल्याचं राणेंना सांगितल्यावर त्यांनी म्हटलं की, ”जर कुणी परीक्षेसच बसत नसेल, तर त्याला प्रमाणपत्र कोण देईल? उद्धव ठाकरे कुठल्याही परीक्षेला बसत नाही आणि पासही होत नाही. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री होऊन वर्ष होत आलं तरी देखील त्यांनी कुठल्याही क्षेत्रासाठी काम केलं नाही. काम तर काहीच करत नाही. घरात पिंजऱ्यात बसतात व रामराम म्हणत राहतात. म्हणून तर राम कदम यांना आंदोलन करावं लागलं.”

तसेच, ”पालघरमध्ये जे हत्याकांड झालं त्याकडे लक्ष्य वेधण्यासाठी, २१२ दिवस होऊनही ते तपास करू शकले नाहीत. आता सीबीआयकडे प्रकरण सोपवावं या मागणीसाठी आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं आहे. मात्र याला विरोध करण्याचं काम केलं जात आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून एकतर विकासकामं बंद केली व सर्व बंद करायचंच काम करत आहेत. त्यामुळे चौकशी देखील त्यांनी काही सुरू ठेवली नाही. या देशातील साधू-संतांवर असा अन्याय होऊ नये, हा या आंदोलनामागचा हेतू आहे.” असं यावेळी राणेंनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 12:59 pm

Web Title: shiv sena is no longer a pro hindu party uddhav thackeray is not of pro hindu ideology rane msr 87
Next Stories
1 हा संघर्ष थांबणार नाही, येणाऱ्या काळात लोकं रस्त्यावर उतरणार – राम कदम
2 …यालाच म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्या तोंडाला काळं फासणं – सचिन सावंत
3 अस्वच्छ टिश्यू पेपरवरुन वाद, ढाब्यावर जेवायला आलेल्या ग्राहकाची हत्या
Just Now!
X