गिरगाव, ग्रॅन्टरोड, मुंबई सेंट्रल, मलबार हिल आदी परिसरातील गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी आधार बनलेली नाना चौकातील सेवा सदन सोसायटीची मराठी माध्यमाची शाळा वाचविण्यासाठी शिवसेना आणि मनसे पुढे सरसावली आहे. कोणत्याही परिस्थितीत शाळेतील शिशू वर्ग बंद करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने, तर इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग बंद करू नये, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
सेवा सदन सोसायटीच्या शाळेतील छोटा शिशू वर्ग बंद करण्याचा घाट व्यवस्थापन घालत असल्याची कुणकुण लागल्यामुळे शाळेतील पालक एकत्र आले आणि त्यांनी व्यवस्थापनाची भेट घेण्यासाठी पत्र सादर केले. त्याचबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही पत्र देऊन भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. काही आजी-माजी पालक आणि मनसेचे पदाधिकारी धनराज नाईक यांची भेट संस्थेच्या विश्वस्तांच्या वकिलांनी घेतली. शनिवारी होणाऱ्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल आणि तो कळविण्यात येईल, असे या बैठकीत विश्वस्तांच्या वतीने कळविण्यात आले. तर इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग बंद करण्यात येणार नाहीत, असे शाळा व्यवस्थापनाने लेखी आश्वासन द्यावे, असा आग्रह धनराज नाईक यांनी यावेळी धरला होता.
या प्रकरणात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून गुरुवारी भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. उभयतांच्या भेटीची वेळ निश्चित झाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यातून शिवसेनेच्या दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पांडुरंग सकपाळ, नगरसेवक अनिल सिंह, शाखाप्रमुख समीर कडलक, शिवाजी राहणे आदींच्या शिष्ठमंडळाने व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत मोठा आणि छोटा शिशू वर्ग बंद करू नये. विद्यार्थी मिळत नसतील तर ते शोधण्यासाठी शिवसैनिक मदत करतील. तातडीने छोटा शिशू वर्गातील प्रवेशासाठी फलक लावावा. हे वर्ग बंद केल्यास शिवसेनेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा पांडुरंग सकपाळ यांनी या भेटीत व्यवस्थापनाला दिला. व्यवस्थापनानेही सामंजस्याची भूमिका घेत विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात येणारा निर्णय कळविण्यात येईल आणि तो सर्वाच्या हिताचा असेल, असे स्पष्ट करण्यात आले.