गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदा प्रताप सरनाईक यांच्या शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपासोबत पुन्हा जुळवून घेण्याची विनंती करणाऱ्या या पत्रानंतर आता प्रताप सरनाईक यांनी थेट विधानसभेतच ईडीकडून त्यांच्या सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात राज्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासाचा अहवाल जाहीर करून त्यानुसार आपल्याला क्लीनचिट देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ईडीकडून गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून एमएमआरडीएमध्ये सुरू असलेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यासंदर्भात प्रताप सरनाईत यांनी आज सभागृहातच राज्य सरकारकडे मागणी केली आहे.

…मीही त्यातलाच एक!

“तुमचा भुजबळ करू, अनिल देशमुख करू” अशा प्रकारची धमकी विरोधकांकडून दिली जात असल्याची तक्रार काही सदस्यांनी केली होती. त्याचा संदर्भ देत प्रताप सरनाईक यांनी आपणही त्यांच्यापैकीच एक असूनं आपलं नाव घेण्यात आलं नसल्याचं नमूद केलं. “केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीचा प्रताप सरनाईक देखील एक भाग आहे. इथल्या चर्चांमध्ये भुजबळांचं नाव घेतलं गेलं, अनिल देशमुखांचं नाव घेतलं. प्रताप सरनाईकही त्यातलाच एक आहे. गेल्या ७ महिन्यांपासून प्रताप सरनाईक तपास यंत्रणांना सामोरा जातोय”, असं ते म्हणाले.

माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप!

दरम्यान, एमएमआरडीएमध्ये सुरक्षारक्षक पुरवण्यासंदर्भात प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात सरनाईक यांनी राज्य सरकारला तपास करण्याची विनंती केली. “आघाडी सरकार स्थापन होण्यात माझा देखील खारीचा वाटा आहे. एमएमआरडीएमध्ये सुरक्षारक्षक पुरवण्याकामी करोडोंचा घोटाळा झाला असा आरोप माझ्यावर केला जातोय. गृह विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला. तो तपास ईडीनं नंतर स्वत:कडे घेतला. पण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून असा घोटाळा झाला आहे किंवा नाही याचा तपास करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे माझ्यावर असे आरोप होत असताना ते राज्य सरकारवर देखील होत आहेत”, असं सरनाईक यावेळी म्हणाले.

“मी काही विजय माल्या वा नीरव मोदी नाही,” ‘त्या’ पत्रानंतर प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर

“..तर राज्य सरकारने मला क्लीनचिट द्यावी”

यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारनेच आपल्याला क्लीनचिट द्यावी, अशी विनंती केली आहे. “मी गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली की यामध्ये राज्य सरकारची देखील बदनामी होत आहे. त्या पत्राच्या संदर्भात अहवाल मागवावा. प्रताप सरनाईकने घोटाळा केला असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तो गजाआड गेलाच पाहिजे. पण घोटाळा केला नसेल किंवा तशी काही कागदपत्र तुमच्याकडे असतील, तर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून गृहखात्याकडे तो अहवाल सादर झाला पाहिजे. गृहखात्याने तो अहवाल लोकांसमोर आणला पाहिजे. जेणेकरून प्रताप सरनाईकने घोटाळा केला आहे का? घोटाळा केला असेल तर मला शिक्षा दिली जाईल आणि नसेल केला तर गृहखात्याकडून आणि राज्य सरकारकडून मला क्लीनचिट दिली जाईल का?”, अशी विचारणा प्रताप सरनाईक यांनी केली.

“संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं”, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!

“योग्य तो निर्णय घेतला जाईल”

दरम्यान, “प्रताप सरनाईकांनी निवेदन दिलं आहे. कालच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ती माहिती मिळाल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.