भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करणाऱया कॉंग्रेसवर शिवसेनेने सोमवारी तोफ डागली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात राहुल गांधी आणि कॉंग्रेसवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी पंतप्रधान व्हावेत, यासाठी उपास-तापास करीत आहेत. पण कॉंग्रेसवाल्यांच्या बायका देश कॉंग्रेसमुक्त व्हावा, यासाठी देव पाण्यात घालून बसल्या आहेत. मोदी हे कायद्याच्या कचाट्यात सापडतील, असे ज्यांना वाटते ते मूर्खांच्या नंदनवनात रांगत आहेत. आधी राहुलबाबांना बाशिंग बांधा व मग मोदींच्या लग्नाची चर्चा करा!, अशी घणाघाती टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, कॉंग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचार व व्यभिचाराचे गटार आहे व तेच कॉंग्रेसवाले आज नरेंद्र मोदी यांच्या लग्नावरून व त्यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्यावरील तथाकथित अन्यायावरून बाह्या सरसावीत उभे राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढण्यासाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जात आपण विवाहित असल्याचे सांगितले आहे. मात्र, या आधी त्यांनी लढवलेल्या निवडणुकांत जी प्रतिज्ञापत्रे सादर केली त्यात विवाह झाल्याचा कुठलाही उल्लेख नव्हता. त्यामुळे मोदी यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी कॉंग्रेसच्या वकिलांनी प्रयत्न चालवले आहेत. ज्या कॉंग्रेजी युवराजांना अद्यापि स्वत:चे लग्नकार्य करता आले नाही व ज्यांच्या मुंडावळ्या सुकून गेल्या आहेत त्यांनीही मोदी यांच्या अंधारातील कुटुंबाविषयी कळवळा व्यक्त केला आहे.
मोदी यांच्या लग्नाचा विषय लावून धरल्याने देशातील महागाई व भ्रष्टाचार कमी होणार आहे काय? कोळसा घोटाळ्यात पैसा खाऊन ज्यांनी भरपेट ढेकर दिला ते सर्व लुटीचा माल देशाच्या तिजोरीत जमा करणार आहेत काय? असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2014 रोजी प्रकाशित
आधी राहुलबाबांना बाशिंग बांधा, मग मोदींच्या लग्नाची चर्चा करा – शिवसेनेचा हल्लाबोल
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करणाऱया कॉंग्रेसवर शिवसेनेने सोमवारी तोफ डागली.
First published on: 14-04-2014 at 11:49 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiराहुल गांधीRahul Gandhiलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena once again criticized rahul gandhi congress over narendra modis marriage issue