पावसाळ्याला तोंड देण्यासाठी रेल्वे सज्ज असल्याचे दावे केले जात असतानाच बुधवारी हलक्या सरींनीच मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या तिन्ही मार्गावर ठिकठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन मुंबईकरांचे मेगाहाल झाले. दरम्यान, आजही मध्य रेल्वेमार्गावर गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची प्रवासकोंडी झाली आहे.

लोकलकोंडी

मध्ये रेल्वेवर बुधवारी रात्री आठच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड, पेंटोग्राफ, ओव्हरहेड वायर तुटणे, वीज पुरवठा खंडित होणे, हे सर्व बिघाड एकाच वेळी ठरावीक अंतराने झाल्याने रेल्वेसेवा पुरती कोलमडली होती. तब्बल ८० सेवा रद्द झाल्याने प्रवाशांचा असंतोष उफाळून आला होता.

मध्य रेल्वे मार्गावरील शीव-मांटुगा, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर अशा चार ठिकाणी रात्री सव्वा आठच्या सुमारास पेंटोग्राफमध्ये बिघाड झाला. त्यामुळे धीमी व जलद वाहतूक विस्कळीत झाली. त्याचवेळी हार्बर मार्गावरील माहीम स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या पेंट्रोग्राफमध्ये बिघाड झाला. त्यात विक्रोळी येथे सर्वच सिग्नल बंद पडल्याने गोंधळात अधिकच भर पडली. मुख्य आणि हार्बर मार्गावरील हा गोंधळ कमी म्हणून की काय, ट्रान्स हार्बरवर ऐरोली येथे रात्री ८.४० वाजता एका गाडीमध्ये बिघाड झाला. यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य तसेच दोन्ही हार्बर मार्गावरील सेवा बंद पडली होती. आज सकाळी मध्य रेल्वेची सेवा पूर्ववत झाली होती. मात्र काही तासांतच रेल्वेचे रडगाणे पुन्हा सुरू झाले.