गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक पूर्ववत झाली आहे. येथील मुख्य धावपट्टीवर स्पाइसजेटचे विमान रुतल्याने अनेक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती. मात्र, काल रात्री हे विमान चिखलातून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. त्यानंतर काल मध्यरात्रीपासूनच मुंबई विमानतळावरील सर्व उड्डाणे सुरू झाली आहेत.

मुंबईचा पाऊस पाहून बिग बी म्हणतात, ‘देव पुन्हा रागावले वाटतं…’

मुंबईत पावसाने मंगळवारी दुपारपासून जोर धरला होता. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे संपूर्ण शहराचा वेग मंदावला होता. त्याचा फटका शहरातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतुकीला बसला होता. त्यामध्ये स्पाइस जेटचे विमान मुख्य धावपट्टीवर चिखलात रूतून पडल्याने विमानांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. त्यामुळे काल दिवसभरात १०८ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली तर ५१ विमाने अन्यत्र वळवण्यात आली. दरम्यान, रनवेवर अडकलेले विमान टो करून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यासाठी आज सकाळी सहा वाजेपर्यंत मुख्य रनवे बंद राहणार असे सांगण्यात आले होते. मात्र, काल रात्रीच विमान चिखलातून बाहेर काढण्यात आल्याने येथील हवाई वाहतूक मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ववत झाली. तत्पूर्वी देशातंर्गत हवाई सेवा पुरवणाऱ्या विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देण्याची किंवा उड्डाणाचे वेळापत्रक बदलून देण्याची तयारी दर्शविली होती. दरम्यान, काल रात्रीपासून मुंबईतील पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे विमान सेवेसह शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे.

पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणं काठोकाठ भरली