पाचव्या मार्गिकेचा वापर करून उपनगरीय वाहतूक

मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिका टाकण्याचे काम प्रगतिपथावर असून आता यातील पाचव्या मार्गिकेचा वापर उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसाठी करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अंधेरी ते बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गावरून लोकलगाडय़ा चालवण्यास रेल्वे महाव्यवस्थापकांकडून मंजुरी मिळाल्याने बोरिवली ते विरारदरम्यान किमान सात लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नव्या वेळापत्रकात या गाडय़ांचा समावेश करण्यात येणार आहे.

लोकल आणि लांब पल्ल्याचा प्रवास सुकर करण्यासाठी मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग प्रकल्पाचे काम काही वर्षांपूर्वी हाती घेतले होते. यातील पाचव्या मार्गाचे काम पूर्ण झाले आले. या मार्गावरून सध्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावतात. मात्र पश्चिम रेल्वेवरून १,३०० पेक्षा जास्त होत असलेल्या लोकल फेऱ्या आणि त्यातच लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या गाडय़ा यामु़ळे आणखी लोकल फेऱ्या चालवणे अशक्य आहे. हे पाहता पश्चिम रेल्वेने पाचवा मार्गाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑक्टोबरपासून लोकलचे नवीन व़ेळापत्रक लागू केले जाईल. यात अंधेरी ते विरार पट्टय़ात लोकल फेऱ्या वाढवून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. मात्र फेऱ्या वाढवून त्या चालवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने पश्चिम रेल्वेसमोर मोठे संकट होते. अखेर लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक पाहून त्याप्रमाणे नियोजन करून लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या सदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले की गेल्या काही वर्षांत अंधेरी ते विरारदरम्यान मोठय़ा प्रमाणात प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. हे पाहता अंधेरी ते विरारदरम्यान सात लोकल फेऱ्या वाढवण्यात येतील. ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यावेळी या फेऱ्या अंधेरी ते बोरिवली या नवीन पाचव्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे.

सात फेऱ्यांचे नियोजन असे असेल..

  • सकाळी गर्दीच्या वेळी तीन फेऱ्या
  • संध्याकाळी गर्दीच्या वेळी दोन फेऱ्या
  • कमी गर्दीच्या वेळी दोन फेऱ्या