विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघड

महाविद्यालय आणि परीक्षा विभागात एक वर्ष खेपा घालूनही बीकॉमच्या शेवटच्या वर्षांची गुणपत्रिका न मिळाल्यामुळे बोरिवली येथील एका विद्यार्थिनीला नोकरी गमावावी लागल्याचे उघडकीस आले आहे. तिच्या नोकरीवर आस लावून बसलेल्या तिच्या परिवारावर यामुळे उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे.

आफ्रीनचे वडील सय्यद हे रिक्षाचालक असून एक वर्षांपूर्वी त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली व कालांतराने पायावरही शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. तेव्हापासून ते कोणतेही काम करत नसून साठवलेल्या पैशांवर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. आफ्रीन नोकरीला लागेल आणि कमाविता हात मिळेल अशी त्यांना आशा होती. त्यानुसार आफ्रिनने एका बडय़ा कंपनीत मुलाखतही दिली होती. तिला २० जुलै रोजी कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले. मात्र गुणपत्रिकेची प्रत नसल्याने तिला कामावर रुजू करून घेण्यास त्यांनी नकार दिला. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे आफ्रीनला नोकरीला मुकावे लागले असून जर तिला वेळेत नोकरी न लागल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल असे तिचे वडील सय्यद यांनी सांगितले. तर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराचा फटका आफ्रीनप्रमाणेच इतर अनेक विद्यार्थ्यांना बसत असून परीक्षा विभाग इतका असंवेदनशील आणि अकार्यक्षम कसा आहे, असा प्रश्न  विद्यापीठाशी संपर्क साधणारे मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय जुन्नकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या विषयावर बोलण्यासाठी परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

आफ्रिनची व्यथा

बोरिवली येथील सय्यद आफ्रीन शहीद अली या विद्यार्थिनीने मार्च २०१५ जोगेश्वरी येथील इस्माइल युसुफ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली. निकालानंतर  आफ्रीनचा निकाल राखून ठेवण्यात आला. याबाबत तिने महाविद्यालयात चौकशी केली असता तिला विद्यापीठाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तिला प्रथम आणि द्वितीय वर्षांचे गुण मिळाले नसल्याने निकाल राखून ठेवण्यात आल्याचे सांगितले. आफ्रीन पुन्हा महाविद्यालयात गेली त्या वेळेस महाविद्यालयाने विद्यापीठाला गुण कळविले असल्याचे सांगत विद्यापीठाला सादर केलेल्या माहितीची प्रत दिली. ही प्रत घेऊन आफ्रीनने पुन्हा परीक्षा विभाग गाठले. तेव्हा महाविद्यालयाने सादर केलेली माहिती तेथे उपलब्ध नसल्याचे समोर आले. आ फ्रीनने तिच्याकडची माहिती परीक्षा विभागाला दिली. तरीही निकाल उपलब्ध झाला नाही. वारंवार  संपर्कानंतर महाविद्यालयाने  परीक्षा तिने दिल्याचे पत्र लिहून दिले. त्या आधारे तिने परीक्षा विभागात निकाल पाहिला मात्र तो निकाल देण्यास तिला नकार देण्यात आला. निकाल जाहीर होऊन एक वर्ष उलटून गेले तरी गुणपत्रिका न मिळाल्याने आफ्रीन  हतबल झाली आहे.