कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण

मुंबई : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आणि अखिल भारतीय सेनेचा संस्थापक अरुण गवळी याचा साथीदार सुनील घाटे याने उर्वरित शिक्षा माफ करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

जामसंडेकर यांची २००७ मध्ये त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गवळी, घाटे यांच्यासह अन्य आरोपी शिक्षा भोगत आहेत. ऑगस्ट २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने या सगळयांना जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. घाटे याला १० वर्षांंच्या कारावासाची शिक्षा झाली होती, तर गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

घाटे याने उर्वरित शिक्षेत माफी देण्याच्या मागणीसाठी अ‍ॅड्. एन. एन. गवाणकर यांच्यामार्फत याचिका केली आहे. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त २०१८ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने एक विशेष आदेश काढला होता. त्याद्वारे आरोपींची उर्वरित शिक्षा माफ करण्याचे म्हटले होते. घाटे यानेही याच आदेशाचा आधार घेत उर्वरित शिक्षा माफ करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.