मध्य रेल्वेवरील लाखो उपनगरीय प्रवाशांना दिलासा देणाऱ्या परळ टर्मिनसच्या प्रस्तावाची घोषणा दोन वर्षांपूर्वी करून दोन महिन्यांपूर्वी हा प्रकल्प बासनात गुंडाळणाऱ्या रेल्वे प्रशासनाने परळ टर्मिनसला नवसंजीवनी दिली आहे. परळ टर्मिनसचे काम पूर्ण होणारच, असे नवे गाजर रेल्वे प्रशासनाने दाखवले असून ‘मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला (पाचवी-सहावी मार्गिका)’ या प्रकल्पाचा भाग म्हणून परळ टर्मिनसचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून येत्या १५ दिवसांत निविदा खुल्या होणार आहेत.
मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील गर्दी आणि परळ स्थानकातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मध्य रेल्वेने परळ येथून उपनगरीय गाडय़ा सुटण्याची योजना आखली होती. त्यासाठी परळ टर्मिनसचा ८० कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाबाबत दोन वर्षे काहीच निर्णय झाला नव्हता.
तीन महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना याबाबत विचारले असता अशा कोणत्याही प्रकल्पाचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे उपनगरीय प्रवाशांच्या सोयीचा प्रस्ताव रेल्वेने नाकारल्याची भावना प्रवासी संघटनांनी व्यक्त केली होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता हा प्रकल्प रेल्वेने अडगळीतून पुन्हा बाहेर काढला आहे. सीएसटी ते कुर्ला (पाचवी-सहावी मार्गिका) या प्रकल्पाचा भाग म्हणून परळ टर्मिनस बांधण्यात येणार असून त्याचा आराखडा मध्य रेल्वेकडे तयार आहे. या प्रकल्पासाठी ८० कोटी रुपयांचा खर्च येणार असून मुख्य पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाच्या खर्चातच याची तरतूद केली आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून १५ दिवसांत निविदा खुल्या होणार आहेत.

टर्मिनससाठी काय?
’ परळ स्थानकातील दक्षिण दिशेचा पादचारी पूल एल्फिन्स्टन रोडच्या रस्ते पुलाशी जोडणार.
’ प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला आणखी एक प्लॅटफॉर्म बांधून त्या मार्गावर परळ लोकल येण्याची व्यवस्था. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाडय़ा एल्फिन्स्टन रोडच्या बाजूला टाकण्यात येणाऱ्या नव्या मार्गिकेवरून जातील.
’ सध्या अस्तित्त्वात असलेला दादरच्या दिशेकडील पादचारी पूल पश्चिम दिशेला उतरवणार.