ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५ व ६ येथे असलेल्या दुसऱ्या सरकत्या जिन्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून १५ ऑगस्टलाच या जिन्याचेही उद्घाटन करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे, असे एका बडय़ा अधिकाऱ्याने सांगितले. मात्र याबाबत आत्ताच सांगणे शक्य नसल्याचे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या उपनगरीय सेवेतील पहिला सरकता जिना मध्य रेल्वेवर ठाणे स्थानकात २७ जुलै रोजी सुरू झाला. ३ आणि ४ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या या जिन्याच्या उद्घाटन प्रसंगी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी दुसरा जिनाही लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.  या जिन्याच्या उभारणीसाठी एकूण ७५ लाख रुपये खर्च आला आहे. २५ लाख रुपये विद्युतीकरणासाठी आणि ५० लाख इतर अभियांत्रिकी कामांसाठी खर्च आला. ठाण्यातील पहिल्या सरकत्या जिन्यांचा वापर दर दिवशी १७ हजारांहून अधिक प्रवासी करतात. यापेक्षा अधिक प्रवासी नव्या सरकत्या जिन्यांचा लाभ घेतील, असा अंदाज या अधिकाऱ्याने व्यक्त केला.