जास्तीत जास्त प्रवेशद्वारे खुली ठेवणार; प्रतिबंधित वेळेत तपासणीसाठी जास्त बंदोबस्त

मुंबई : राज्य सरकारने सर्वसामांन्यांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर रेल्वे स्थानकांतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा बलातील (आरपीएफ) अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या व्यूहरचना आखली आहे. प्रत्येक स्थानकातील एकापेक्षा जास्त प्रवेशद्वार, पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असून प्रतिबंधित वेळेत प्रवाशांच्या तपासणीसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची तजवीज करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांना प्रवासास परवानगी असलेल्या वेळेत प्रत्येक रेल्वे स्थानकात गर्दी अपेक्षित आहे. ही गर्दी लक्षात घेता गरजेनुसार दोन, तीन किंवा जास्त प्रवेशद्वार, पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले केले जातील. प्रत्येक प्रवेशद्वारावर मनुष्यबळ तैनात असेल. प्रवेशद्वारासह फलाटांवर चेंगराचेंगरी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. सकाळी सात ते दुपारी १२ आणि दुपारी चार ते रात्री नऊ या १० तासांत परवानगी नसलेल्या सर्वसामान्य प्रवाशांची स्थानकाच्या आवारात गर्दी होऊ शकते. ही बाब विचारात घेऊन या वेळेत स्थानकाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाचे प्रवेश ओळखपत्र, परवानगी पत्र तपासले जाईल, असे पोलीस उपायुक्त (जीआरपी) प्रदीप चव्हाण यांनी स्पष्ट के ले.

त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्भय पथके, विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. स्थानक आवारातील सीसी टीव्ही कॅ मेरांद्वारे प्रवाशांच्या गर्दीवर करडी नजर ठेवली जाईल. स्थानकाच्या प्रत्येक भागत जीआरपी, आरपीएफ, गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.

जीआरपी  मुंबई आयुक्तालयातील सुमारे ३१०० अधिकारी, अंमलदार १ फेब्रुवारीपासून गर्दीचे नियंत्रण, झाडाझडती, तपासणीसाठी तैनात असतील. याशिवाय गृहरक्षक दलाच्या सुमारे दोन हजार जवानांची कुमक या कामी रेल्वे पोलिसांना मिळेल. गरज भासल्यास महाराष्ट्र सुरक्षा मंडळातील जवान उपलब्ध होतील, यासाठी रेल्वे पोलीस प्रयत्न करत आहेत.

उपनगरीय स्थानकात एक हजार आरपीएफ जवान आहेत. त्यांच्या कामांच्या वेळांचेही नियोजन केले आहे. स्थानकातील गर्दीच्या नियंत्रणासाठी  दोन ड्रोन कॅमेरे खरेदी केले जाणार आहेत, अशी माहिती पश्चिाम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (आरपीएफ) विनीत खरप यांनी दिली.

रंगीत तालीम

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यावर गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी लावलेल्या बंदोबस्ताची रेल्वे पोलिसांकडून रंगीत तालीम(मॉक ड्रिल) घेतली जाणार आहे. त्यात प्रवेशद्वारांतून प्रवासी सहज, सुलभरीत्या स्थानकांवर कसे पोहोचतील, अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी उसळली तर किंवा प्रवेशद्वारावर खोळंबलेले प्रवासी हिंसक बनल्यास काय उपाय योजावा, याचा अभ्यास केला जाईल.

सध्या  महत्वाच्या व गर्दीच्या स्थानकात १०० ते १२५ आरपीएफ व लोहमार्ग पोलीस होते. गर्दी नियंत्रणासाठी त्यांची संख्या २०० पर्यंत करण्यात येईल. बंद असलेले काही प्रवेशद्वार, पादचारी पूलही सुरु के ले जाणार आहेत. आरपीएफचे मनुष्यबळ वाढून १५०० पर्यंत नेण्यात येईल. -जितेंद्र श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, (आरपीएफ) मध्य रेल्वे