मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांत सहज वावरत गेल्या दशकभरात तळपत राहणारा अभिनेता ही सुबोध भावे यांची ओळख. या अष्टपैलू आणि अभ्यासू अभिनेत्याशी ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या कार्यक्रमात आज गप्पाष्टक रंगणार आहे.
‘लोकमान्य – एक युगपुरुष’, ‘बालगंधर्व’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चरित्रपटांमधून सुबोध भावे यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. मराठी ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची आवड आबालवृद्धांमध्ये रुजविण्यात सुबोध भावे यांचा खणखणीत अभिनय कारणीभूत आहे. एकाच वेळी मोठा पडदा गाजवत असताना भावे यांनी छोटय़ा पडद्याचाही आदर राखला. त्याचबरोबर रंगभूमीपासून फारकत घेतली नाही. सुबोध भावे यांच्या आजवरच्या वाटचालीचा आलेख आज सायंकाळी ५ वाजता गप्पांमधून उलगडण्यात येणार आहे.
बहुरंगी व्यक्तिमत्त्व..
समाजमाध्यमांपासून चित्रपट माध्यमापर्यंत सर्जनशील प्रक्रियेशी जोडून घेत कार्यरत असलेले सुबोध कलाकार म्हणून सामाजिक बांधिलकीही कायम जपत आले आहेत. त्यांच्या या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेणारा गप्पांचा ‘भावे प्रयोग’ ‘सहज बोलता बोलता’ या कार्यक्रमातून रंगणार आहे.
सहभागासाठी .. https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_10July येथे नोंदणी आवश्यक.