महिलांच्या संघ प्रवेशासाठी आता तृप्ती देसाई यांचा आग्रह
शनि शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली या धार्मिक स्थळांपाठोपाठ ‘भूमाता ब्रिगेड’चे लक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांकडे वळले आहे. या शाखांमध्ये महिलांना प्रवेश द्यावा, अशी मागणी करीत ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी, पुरोगामी विचारांच्या संघनेतृत्वाने संघटनेत महिलांना बरोबरीचे स्थान आणि शाखांमध्ये महिलांना प्रवेश देऊन ‘अच्छे दिन’चा प्रत्यय द्यावा, अशी मागणी केली.
मंदिर प्रवेशामध्ये महिलांना समान अधिकार मिळावेत, कोणतेही र्निबध असू नयेत, अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली होती आणि देसाई यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. त्यामुळे संघासारखी मोठी संघटना ही पुरोगामी विचारांची असून त्यामध्ये महिलांना समान संधी किंवा पुरुषांच्या बरोबरीने शाखांमध्ये प्रवेशावर र्निबध घालणे आजच्या काळात योग्य नाही, अशी भूमिका देसाई यांनी घेतली आहे. त्यासाठी त्या सरसंघचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत. देशातील प्रार्थनास्थळांमध्ये महिलांचा प्रवेश र्निबधमुक्त असावा, यासाठी केंद्राने पावले टाकावीत, या विनंतीसाठी आपण पंतप्रधानांना भेटणार असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
संघ नेतृत्वाने तुमची मागणी मान्य न केल्यास नागपूरला रेशीमबागेपुढे किंवा संघशाखांपुढे आंदोलन करणार का, असे विचारता संघनेतृत्वाकडून आमची मागणी मान्य होईल आणि आंदोलनाची वेळच येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्त्रिया आज सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असून त्यांना कुठेही दुय्यम वागणूक मिळू नये, यासाठी आपल्या संघटनेपासूनच संघाने सुरुवात करावी, असे त्या म्हणाल्या. संघविचाराचा केंद्र आणि राज्यातील सरकारवर प्रभाव असल्याने संघाने पुरोगामी भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यानिमित्ताने संघ शाखेतील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.

मागणी जुनीच..
संघ शाखेत पुरुषांच्या बरोबरीने महिलांना प्रवेश ही मागणी जुनी आहे. अर्थात शाखांमध्ये मुली आल्यास त्यांना परत पाठविले जात नाही, असे सूत्रांनी सांगितले.