मुंबई : संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींनी दक्षिण मुंबईत बांधलेल्या अवैध इमारतींमधील आर्थिक व्यवहार तपासताना रोख रकमेसह चांदीची देवाणघेवाण समोर आली आहे. सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या या व्यक्ती दोन ते पाच लाख रुपयांची चांदी का स्वीकारत होते, याबाबत गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.

अटकेत असलेला गँगस्टर एजाझ लकडावालाचे साथीदार तारिक परवीन, सलीम पेनवाला ऊर्फ सलीम महाराज यांनी डोंगरी, पायधुनी भागातील जुन्या, बहुमजली चाळींवर आठ ते दहा मजले अवैधरीत्या उभारल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. इमारत उभारणीतील गुंतवणूक, अवैध माळ्यांवरील घरे किंवा व्यावसायिक गाळ्यांचे विक्री व्यवहार, महापालिकेसह अन्य यंत्रणांचे आवश्यक असलेले परवाने आदींबाबत तपास सुरू आहे. त्यातच परवीन, महाराज घरे किंवा व्यावसायिक गाळे विकताना एकूण किमतीतील काही भाग चांदीच्या स्वरूपात घेत असते, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

परवीन, सलीम यांची सोने तस्करीची संघटित टोळी होती. त्या माध्यमातून दोघांनी कोटय़वधींचे सोने दुबईमार्गे भारतात आणले आणि विकले. असे असताना अवैध इमारतींच्या माध्यमातून रोख रकमेसोबत चांदीच का? याचा उलगडा मात्र गुन्हे शाखेला अद्याप झालेला नाही. त्यासाठी गुन्हे शाखेकडून तारीक, सलीमसह अन्य व्यक्तींकडे चौकशी सुरू असल्याचे समजते.

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने परदेशात दडून मुंबईतील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या एजाझला पाटण्याहून अटक केली होती. त्याच्या चौकशीतून तारिक, सलीम यांची नावे पुढे आली. त्यानुसार त्यांनाही बेडय़ा ठोकण्यात आल्या. मुंबईतील व्यावसायिकांचे तपशील एजाझला पुरवल्याचा आरोप दोघांवर आहे.

तारिक बहुचर्चित सारा-सहारा प्रकरणातील आरोपी असून त्याला विशेष मोक्का न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. तर सलीम हा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील खबरी होता. या दोघांनी एजाझचे नाव वापरून स्वत:च खंडणी उकळण्याचे उद्योग सुरू केले होते. याची उपरती एजाझला अटकेनंतर झाली, असे गुन्हे शाखेतील अधिकाऱ्याने सांगितले.