विषाणूंचे उत्परिवर्तन ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया असून साथरोगांच्या व्यवस्थापनासाठी विषाणूंच्या जनुकीय क्रमवारी चाचण्या सातत्याने होणे आवश्यक आहे. कोणत्या जनुकीय क्रमवारीतील विषाणूचा रुग्णाला संसर्ग झाला आहे त्याने रुग्णाच्या प्रकृतीत फरक पडत नाही, मात्र व्यापक प्रसार रोखण्यासाठी जनुकीय क्रमवारी महत्त्वाची आहे. सध्या उत्परिवर्तन झालेल्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपलब्ध लशी प्रभावी ठरतील, असे मत देशातील प्रमुख वैज्ञानिक संस्थांच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी व्यक्त केले.

करोनाच्या जनुकीय क्रमवारीमध्ये (जिनोम सिक्वेन्सिंग) संशोधन करणाऱ्या देशातील महत्त्वाच्या संस्थांचे अध्यक्ष आणि संशोधक यांनी दूरचित्रसंवादातून जनुकीय क्रमवारीबाबत चित्र स्पष्ट केले. यावेळी भारतीय औद्योगिक, वैज्ञानिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे, केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरुप, राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्थेच्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम, डॉ. अनुराग अगरवाल, डॉ. सुधांशु व्रती, डॉ. एस. दास, डॉ. शाहिद जमिल आणि इतर तज्ज्ञ सहभागी झाले होते.

विषाणूच्या उत्परिवर्तनाचा विचार करता त्याचे स्थळ-काळानुसार संदर्भ बदलतात. त्यामुळे दोन वेळा उत्परिवर्तन, तीन वेळा उत्परिवर्तन या तपशीलांकडे संदर्भानुरूप पाहण्यात यावे. सध्या उत्परिवर्तनानंतर विषाणूची जी रूपे समोर येत आहेत, त्यावर उपलब्ध असलेल्या लशी प्रभावी ठरतील असे दिसत आहे,’ असे डॉ. दास यांनी सांगितले.

डॉ. रेणु स्वरूप म्हणाल्या, जनुकीय क्रमवारीतील कोणत्या उत्परिवर्तनामुळे रुग्णाला संसर्ग झाला याने रुग्णावरील उपचार बदलणार नाहीत. मात्र, त्या उत्परिवर्तनाचा प्रसाराचा वेग, मारक क्षमता अशा बाबी व्यापक पातळीवर साथरोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. मुखपट्टी आणि सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन हे उत्परिवर्तन झालेल्या विषाणूंपासुनही सुरक्षित राहण्यास उपयुक्त आहे, याचे भान ठेवावे. देशात येणारी प्रत्येक लस उत्परिवर्तीत विषाणूंपासुन संरक्षण देण्यास योग्य आहे की नाही यावरही व्यापक संशोधन सुरू आहे. अधिकाधिक जनतेचे लसीकरण ही करोना संसर्गापासून बचावासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक उत्परिवर्तन धोकादायक नाही

वुहानमध्ये सापडलेल्या करोना विषाणूमध्ये आतापर्यंत असंख्य वेळा उत्परिवर्तन झाले आहे. करोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत कोणतेही बदल झालेले असले तरी त्याला रोखण्यासाठी तोंडाला मुखपट्टी लावणे, हात सतत धुणे आणि निर्जंतूक द्रावणाचा वापर करणे हेच प्रत्येक बदललेल्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक आहे. जितक्या मोठ्या संख्येने मानवाला या विषाणूची बाधा होईल तितक्या मोठ्या संख्येने त्यात बदल होतील. विषाणूमधील सर्वच बदल हे धोकादायक नसतात. मात्र जनुकीय संरचनेतील एखाद्या बदलामुळे विषाणू औषधांना प्रतिसाद देत नसेल, लस परिणामकारक ठरत नसेल, निदान होत नसेल, प्रतिपिंडे (अ‍ॅण्टीबॉडिज) निष्प्रभ ठरत असतील तर असे बदलच धोकादायक म्हणावेत. व्यक्तीच्या शरीरातील अन्य दीर्घ आजार, रुग्ण जिथे राहतो तेथील भौगोलिक परिस्थिती हेदेखील  विषाणूमधील हे बदलाशी संलग्न आहेत. आरटीपीसीआर चाचणी ही खात्रीलायक चाचणी असून त्यात सर्व  प्रकारचे बदल असलेले विषाणूचे प्रकार आढळून येत आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मुखपट्टी आवश्यक

उत्पनरिवर्तन हे विषाणूला जिवंत राहण्यासाठी मदत करते, मात्र करोना विषाणूचे उत्परिवर्तन असो किंवा नसो, मुखपट्टी वापरणे हा करोना संसर्गापासून वाचण्याचा महत्त्वाचा उपाय आहे, असे डॉ. शेखर मांडे यांनी स्पष्ट केले.

पाच प्रयोगशाळांचा सहभाग

देशात सध्या दहा राष्ट्रीय पातळीवरील प्रयोगशाळा विषाणूंच्या उत्परिवर्तनासह जनुकीय क्रमवारी निश्चित करण्याचे काम करत आहेत. किमान पाच टक्के नमुन्यांची जनुकीय क्रमवारी चाचणी व्हावी, असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. तेवढ्या प्रमाणात नाही, तरी मोठ्या प्रमाणात नमुन्यांची जनुकीय क्रमवारी तपासणी करण्यात येत आहे. लवकरच आणखी पाच प्रयोगशाळा यामध्ये समाविष्ट होणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.