वाशी पोलिसांचा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर प्रस्ताव

मुंबईहून नवी मुंबईमार्गे बाहेर जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या वाशी खाडीपुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढू लागल्याने नवी मुंबई पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता वाशी पोलिसांनी जुन्या आणि नवीन खाडीपुलांवर फायबरचे आवरण बसवण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठेवला आहे. गेल्या १५ दिवसांत झालेल्या दोन जणांच्या आत्महत्येच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर वाशी पोलिसांच्या या प्रस्तावाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

गेल्या १५ दिवसांत तीन व्यक्तींनी पूलावरुन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला असून त्यातील दोन जणांचा मृत्यू ओढवला आहे. तर गेल्या १५ महिन्यांत २२ व्यक्तींनी येथून आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला असून त्यातील ८ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ३ अजूनही बेपत्ता आहेत. मानखूर्द आणि वाशी दरम्यानच्या नव्या खाडीपुलावर वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र, जुन्या पुलावरून वाहतूक कमी होत असल्याने तो बऱ्यापैकी निर्मनुष्य असतो. त्यामुळे वैफल्यग्रस्त व्यक्ति या पुलावरून खाडीत उडी मारून जीवन संपवत असल्याचे दिसून आले आहे. वाशी खाडीत मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छिमारांकडून अनेकांना बुडण्यापासून वाचवण्यात आले आहे. मात्र, अशा घटना रोखण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा याठिकाणी नाही.  त्यामुळेच दोन्ही पुलांना फायबरचे कुंपण लावले तर या आत्महत्या रोखता येतील, अशी सूचना वाशी पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मांडली आहे. कुठल्याही प्रकारे हे जीव वाचावेत यासाठी आमचा प्रयत्न असून त्यावर लवकर निर्णय व्हावा, अशी आमची अपेक्षा वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजयकुमार लांडगे यांनी व्यक्त केली.

आत्महत्येच्या घटना

  • शुक्रवार १५ एप्रिल – मुलाच्या मृत्यूच्या विरहाने वैफल्यावस्थेत गेलेल्या ५५ वर्षीय अशोक बाईत यांनी आत्महत्या केली.
  • शुक्रवार ८ एप्रिल – परिसरातील व्यक्तींनी सिगारेट पिताना पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिल्याने घाबरलेल्या वडाळ्याच्या दोन मुलांनी खाडीपूलावरुन उडी मारली, यात ऋतिक पाटकर याचा मृत्यू झाला. तर गाळात रुतलेल्या दुसऱ्या मुलाला मच्छिमारांनी वाचवले.

आतापर्यंतच्या घटना

  • मार्च २०१६ – पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न. दोघांचा मृत्यू.
  • २०१५-१७ व्यक्तींचा आत्महत्येचा प्रयत्न. ६ जणांचा मृत्यू.