03 June 2020

News Flash

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नियमांची ऐशीतैशी

मार्गिका शिस्तीचे उल्लंघन, जानेवारीत १३ हजार ७०८ वाहनांवर कारवाई

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा वापर करणारे सर्वच वाहनचालक मार्गिका नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जानेवारीत नियमभंग करणाऱ्या १३ हजार ७०८ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

महामार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईत बस, ट्रक, मोटारी या खासगी वाहनांबरोबरच एसटी या सरकारी वाहतूक सेवेतील बसगाडय़ांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. बेशिस्त वाहनचालकांमुळे द्रुतगती महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचेही महामार्ग पोलिसांनी सांगितले. महामार्ग पोलिसांनी जानेवारीत १३ हजार ७०८ वाहनांवर कारवाई केली. त्यात ट्रकचालक मार्गिकेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात, असे आढळले. जानेवारीत पाच हजार ४५५ ट्रकचालकांवर मार्गिकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ मोठमोठे कंटेनर वाहून नेणारी वाहने, मोठय़ा टँकरसह दोन हजार ६६५ अवजड वाहनांवरही बडगा उगारण्यात आला. यावेळी एक हजार ३४६ खासगी बसचालकांवरही कारवाई करण्यात आली.

एसटीचालकही बेपर्वा

महत्त्वाची बाब म्हणजे मार्गिकांचे उल्लंघन करण्यात सरकारी वाहतूक सेवा देणाऱ्या, एसटीचे चालकही पुढे आहेत. जानेवारीला कारवाईत ३४२ एसटी बसच्या चालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय पर्यटक वाहने, डंपर, छोटे टँकर, टेम्पो यांसह अन्य वाहनांवरही बडगा उगारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहनचालकांकडून नियमभंग

* अवजड आणि प्रवासी वाहनांना मार्गिकेच्या डाव्या बाजूने, तर हलक्या वाहनांना मधल्या मार्गिकेवरून जाणे बंधनकारक आहे. मात्र वाहनचालक त्याचे सर्रास उल्लंघन करतात.

* मार्गिकेची शिस्त न पाळल्यास मागून येणाऱ्या वाहनाची पुढील वाहनाला धडक बसल्याच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. मात्र कारवाई करूनही वाहनचालक वठणीवर येत नाहीत.

* नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना २०० रुपये दंड केला जातो. एखाद्याने यापूर्वीही उल्लंघन केले असल्यास आणि दंड भरला नसल्यास दंडाची रक्कम वाढते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 12:46 am

Web Title: violation of rules on mumbai pune speeding route abn 97
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, सरकारवर टीका!
2 विधान परिषदेच्या नवव्या जागेसाठी चुरस
3 ‘आरटीओ’तील कामांचा खोळंबा
Just Now!
X