लांब पल्ल्याच्या रेल्वेचे आरक्षण तिकीट ‘प्रतीक्षायादी’त असतानाही प्रवास करण्याच्या तयारीत असाल, तर सावधान! प्रतीक्षायादीतील (वेटिंग लिस्ट) तिकिटावर प्रवास करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे असा प्रवास करणारे ‘विनातिकीट’ ठरणार असून त्यांना अध्र्या प्रवासात खाली उतरवण्याची सूचना तिकीट तपासनीसांना देण्यात आली आहे. आरक्षित तसेच अनारक्षित डब्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने हा नियम केला आहे.
आतापर्यंत इंटरनेटवरून काढलेले लांब पल्ल्याच्या गाडीचे रेल्वेतिकीट प्रतीक्षा यादीत असल्यास त्या तिकिटावरून प्रवास करता येत नव्हता. मात्र रेल्वेच्या तिकीट आरक्षण केंद्रावरून काढलेले तिकीट प्रतीक्षायादीत असल्यास त्याला प्रवासाची मुभा होती. आता प्रतीक्षायादीत असलेल्या सरसकट सर्वानाच हा नियम लागू होणार आहे.  ‘वेटिंग तिकीट’ असल्यास तिकीट तपासनीसाकडून जागा उपलब्ध असल्याची खात्री केल्याशिवाय प्रवास करता येणार नाही.
या नियमाची अमलबजावणी तातडीने करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. ‘वेटिंग’ तिकीट असलेले प्रवासी जागा मिळण्याच्या आशेने आरक्षित वा अनारक्षित डब्यांतून प्रवास करायचे. त्यामुळे डब्यांतील गर्दी वाढत होती. यावर उपाय म्हणून रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.  

आनंद आणि नाराजीही..
वेटिंग तिकिटावर प्रवास करणारे प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करायचे. त्यामुळे आम्हालाही त्रास होत असे. मात्र रेल्वेच्या या नियमाची अमलबजावणी झाल्यास त्याचा फायदा नक्कीच होईल, असे मत एका प्रवाशाने व्यक्त केले. तर, प्रवासी आणि गाडय़ा यांच्या विषम संख्येमुळे आधीच त्रास होत आहे. त्यातच पूर्ण पैसे भरूनही उभ्याने प्रवास करून जाण्याची तयारी असलेल्यांवर रेल्वेने असे र्निबध आणणे योग्य नाही, असे मत काहींनी व्यक्त केले.