तुरळक सरींचा हवामान विभागाचा अंदाज

गणपतींच्या आगमनापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस आता विश्रांती घेण्याचे संकेत आहेत. मागील पंधरवडय़ापासून कोकण किनारपट्टीवर जोरदार सरींचा इशारा देण्यात आला होता. मात्र, सोमवारपासून पुढील पाच दिवस तरी तसा कोणताही इशारा नसून, मंगळवारी कोकणासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी केवळ तुरळक सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ापासून दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ानंतर रंग भरायला सुरुवात केली. राज्यभरात मुसळधार पाऊस झाला. गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी पावसातूनच मंडपात न्याव्या लागल्या होत्या. एवढेच नव्हे, तर मुंबईत पाच दिवसांच्या बहुतांश गणपतींचे विसर्जनही अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्याची वेळ आली. रविवारी सकाळीही शहराच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, दुपारनंतर पावसाळी ढग निवळू लागले असून सोमवार, मंगळवारी पावसाच्या तुरळक सरी कासळतील, असा अंदाज मुंबई हवामान विभागाने नोंदवला आहे. मुंबईसह कोकणातही हीच स्थिती असेल. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तर काही ठिकाणी केवळ शिडकावा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणपती विसर्जनांच्या मिरवणुकांमध्ये पावसाचा अडथळा नसेल.

भरती

५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेअकरा वाजता व रात्री पावणेबाराच्या सुमारास भरती असून संध्याकाळी साडेपाच आणि ६ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओहोटी आहे.

जीवरक्षकांचा विमा

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून मुंबईतील चौपाटय़ांवर विसर्जनासाठी जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या जीवरक्षकांचा प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा दुर्घटना विमा उतरवण्यात आला आहे. अनेक कोळी बांधव आणि जीवरक्षक गणपती विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी खोल समुद्रात जात असतात.