राज्यातील इतर भागांपेक्षा कितीतरी अधिक पाऊस पडूनही उन्हाळा सुरू झाला की पाण्याचा पहिला टँकर कोकणात जातो. कारण तिथले पाणी अडविण्यात, जिरवण्यात अजूनही संशोधकांना यश आलेले नाहीत. इतकेच काय तर कीड लागल्यामुळे आंब्याचे होणारे नुकसान थांबविणेही अद्याप एकाही संशोधकाला जमलेले नाही. लोकांच्या दैनंदिन प्रश्नांवर आपल्या संशोधनाने उपाय योजता येत नसतील तर लाख-दीड लाख रुपये पगार घेऊन आपले प्राध्यापक-संशोधक करतात काय, असा सवाल गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबईत भरलेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ या विज्ञान मेळ्यात केला.
नगरविकासावरील परिसंवादानंतर वायकर यांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी, मुंबईतील पाणी, कचरा, वाहतूक, घरबांधणी, पर्यटन, आरोग्य अशा सर्वच विषयांना हात घालत या प्रश्नांचा अभ्यास करण्यात अभ्यासक कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कृषी किंवा इतर विद्यापीठातून काम करणारे संशोधक-प्राध्यापक यांना केवळ आपली पीएच. डी, बढत्या, वेतनवाढ यांच्याशीच देणेघेणे असते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांच्या अभ्यासाचा भर नसतो. परंतु, आता प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे सर्वसामान्यांचे आयुष्यमान वाढविण्याबरोबरच ते दर्जेदार करण्यासाठी संशोधकांनी व अभ्यासकांनी झटले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शहराच्या विकासासंदर्भात टिपण्णी करताना ते म्हणाले, की रस्त्यावर वाहने उभी करण्याची बेशिस्त चालणार नाही. त्यामुळे, एका सदनिकेसाठी दोन गाडय़ा पार्किंगची सोय विकासकाला करावी लागेल, असा नियम आम्ही केला आहे. समुद्रमार्गाने वाहतूक करण्याच्या प्रकल्पांनाही आम्ही लवकरच मान्यता देऊ, असेही ते म्हणाले.

मुंबईचा आराखडा
गेली तीन वर्षे मुंबईचा विकास आराखडा या ना त्या कारणाने रखडला आहे. या आराखडय़ावर काम सुरू असून २०१५मध्ये तो येईल, असे आश्वासन वायकर यांनी दिले.