प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : मराठीतील दुर्मीळ ग्रंथसंपदेचे जतन व्हावे, यासाठी ग्रंथांच्या संगणकीकरणाचा (डिजिटायजेशन) प्रकल्प हाती घेणाऱ्या ‘राज्य मराठी विकास संस्थे’ने या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचीही यशस्वीरीत्या सुरुवात के ली आहे. खेड येथील ‘राजगुरूनगर सार्वजनिक वाचनालया’तील २५ पुस्तकांच्या ६३०६ पानांचे संगणकीकरण ऑक्टोबरच्या प्रारंभी पूर्ण झाले.

स्वामित्वहक्क संपलेल्या पुस्तकांचे संगणकीकरण करण्याचा प्रकल्प २०१० सालच्या सांस्कृतिक धोरणात सुचवण्यात आला होता. २०१३ ते २०१६ या कालावधीत पहिला टप्पा पार पडल्यानंतर २०१७ साली विविध ग्रंथालये, संशोधन संस्था यांच्यासोबत बैठक आणि २०१९ साली शतायु ग्रंथालयांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेतील ‘राजगुरूनगर सार्वजनिक वाचनालया‘ने प्रतिसाद दिल्यानंतर त्यांच्याकडील दुर्मीळ पुस्तकांच्या संगणकीय प्रतिमाच नव्हे तर संगणकीय पाठय़ही (टंकलिखित मजकू र) तयार करण्यात आले. मराठय़ांच्या इतिहासाची साधने, विधवा विवाह, न्यायरत्न इत्यादी ग्रंथांचा यात समावेश आहे.

ग्रंथ संगणकीकरण प्रकल्पामुळे मराठी भाषा अथवा वाङ्मय यांचा अभ्यास करणाऱ्यांना एकोणिसाव्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप, त्या काळातील वाङ्मयीन आणि वैचारिक परिस्थिती यांचा अभ्यास करण्यासाठी साधने उपलब्ध होतील. मुद्रणकलेच्या अभ्यासकांना त्या त्या काळातील मुद्रणांचे नमुने उपलब्ध होतील. मुद्राक्षरे आणि मजकुराची मांडणी कशी के ली आहे, याचाही अभ्यास करता येऊ  शकतो. सर्वसामान्यांना पूर्वीच्या काळातील लोकांचा भाषाव्यवहार आणि वाङ्मयीन व्यवहार यांची माहिती मिळेल.  https://commons.wikimedia.org/wiki/Category:Books_digitized_from_the_grant_by_Rajya_Matathi_Vikas_Sanstha_(Govt._of_Maharashtra) यावर आणि संस्थेच्या संकेतस्थळावर पुस्तके  विनामूल्य उपलब्ध आहेत.

पहिला टप्पा

पुण्याच्या शासकीय विभागीय ग्रंथालय, महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थांच्या ग्रंथांचे संगणकीकरण झाले. यात नियतकालिकोंचे ५५५ अंक (पृष्ठसंख्या ५८०००), १२९ ग्रंथ यांचा समावेश. ग्रंथ – विल्यम के री या ख्रिस्ती धर्मोपदेशकाने तयार के लेले ‘ए ग्रामर ऑफ दि महरट्टा लँग्वेज’ची दुसरी आवृत्ती (इ. स. १८०८). व्हेन्स के नेडी यांचा ‘ए डिक्शनरी ऑफ दी मराठा लँग्वेज’ मराठी-इंग्लिश, इंग्लिश-मराठी असा द्वैभाषिक शब्दकोश (इ. स. १८२४). नियतकालिके  – विविधज्ञानविस्तार, निबंधमाला, इतिहास आणि ऐतिहासिक, काव्येतिहाससंग्रह, ज्ञानोदय.

काळजीवाहू प्रक्रिया 

’  पुस्तके  निर्जंतुक करण्यासाठी विशिष्ट तापमानात काही काळ ठेवली जातात.

’  जुन्या पुस्तकांची पाने आम्लामुळे काळवंडतात व कडक होतात. त्यामुळे ती हाताळताना पानांचे तुकडे पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागते.

’ बांधणी संपूर्ण सोडवून पाने सुटी के ली जातात. शाई पाण्याने पुसली जाणार नसल्याची खात्री रासायनिक परीक्षणाद्वारे झाल्यानंतर पाने स्वच्छ पाण्यात ठेवली जातात. त्यायोगे त्यांतील आम्ल निघून जाते आणि पाने पूर्वीसारखी लवचीक होतात.

’  फार जुनी पाने असतील तर प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूंना जपानी टिश्यूपेपर लावला जातो. बांधणीच्या जागी अधिकचे टिश्यूपेपर असल्याने पुस्तकांची पुनर्बाधणी करताना मूळ पानांना इजा पोहोचत नाही.

’  पृष्ठांच्या संगणकीय प्रती तयार करताना त्या विशिष्ट वियोजनाच्या (रेझोल्यूशन) तयार कराव्या लागतात. प्रत्येक पुस्तकाची स्वतंत्र धारिका (फाइल) तयार होते. त्यानंतर धारिकांचे आकारमान कमी के ले जाते.

’  प्रतिमा अधिक स्पष्ट करणे, त्यांवरील डाग काढणे अशा प्रक्रिया संगणकीय प्रतिमा संपादन करण्याच्या आज्ञावलींच्या साहाय्याने के ल्या जातात.

’  धारिकांमध्ये संस्थेची मुद्रा, निवेदन जोडून दिले जाते. अनुक्रमणिकेच्या पृष्ठांवर प्रत्येक लेखाचे दुवे दिले जातात.