मुंबई : आयटीआय ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जवळपास १ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यापैकी १ लाख ६३ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले आहेत. तर १ लाख ११ हजार ६४० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत.
आयटीआय प्रवेश प्रक्रियेला १५ मेपासून सुरुवात झाली. १५ मे ते १८ जून या महिनाभराच्या कालावधीत आयटीआयच्या १ लाख ५४ हजार जागांसाठी तब्बल १ लाख ८० हजार १५ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. यापैकी १ लाख ६६ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी आपला अर्ज अंतिम केला आहे. त्यापैकी १ लाख ६३ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क भरले आहे. २६ मेपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत अर्ज निश्चिती केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ११ हजार ६४० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. प्रवेश अर्ज भरल्याची मुदत संपल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर होईल. यानंतर विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
आयटीआयच्या यंदा प्रवेशासाठी ४१९ शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार व ५८८ अशासकीय आयटीआयमध्ये ६१ हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार जागा आहेत. एक वर्ष कालावधीचे ४४ अभ्यासक्रम व दोन वर्ष कालावधीचे ३६ अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ मेपासून https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळ अर्ज भरण्यात येत आहेत.
१८ जूनपर्यंतच आकडेवारी
नोंदणी झालेली : १,८०,०१५
अंतिम अर्ज : १,६६,६०६
शुल्क भरलेले अर्ज : १,६३,८०८
पसंतीक्रम भरलेले : १,११,६४०